(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अंगकृष रघुवंशी ज्याने अलीकडेच आपल्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबत सर्वांना संभ्रमात ठेवलं होतं पण आताच्या खेळीनंतर त्याने आपल्या फॉर्मबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रघुवंशीने ईडन गार्डन्सवर अवघ्या ५५ चेंडूंमध्ये एक शानदार शतक झळकावलं. सुरुवातीच्या टप्प्यात सावधगिरीने खेळल्यानंतर, मधल्या षटकांमध्ये त्याने आपल्या खेळाचा वेग वाढवला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि ‘स्पीड मर्चंट’ उमरान मलिक यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ २ धावा काढून बाद झाला. दुसरीकडे, उमरान मलिक हा सर्वात मोठी निराशा ठरला. आपल्या ३.२ षटकांच्या गोलंदाजीमध्ये, उमरानने एकही बळी न घेता ४७ धावा दिल्या. विशेष म्हणजे, उमरानने टाकलेल्या एकाच षटकात रघुवंशीने २३ धावा बनवल्या. शस्त्रक्रियेमुळे हर्षित राणा संघाबाहेर असल्याने, उमरान आणि कार्तिक त्यागी यांच्यावर मोठी जबाबदारी आणि अपेक्षा आहेत; मात्र, उमरानचा सध्याचा फॉर्म संघासाठी एक मोठा धोक्याचा इशारा ठरत आहे.
हर्षित राणाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या शर्यतीत कार्तिक त्यागी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत, त्याने आपल्या ४ षटकांत ३० धावा देऊन ३ बळी मिळवले. त्यांच्याव्यतिरिक्त, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर ब्लेसिंग मुजरबानीने एक बळी मिळवला. पहिल्या डावात टिम सेफर्ट (४७) आणि रिंकू सिंग (४०) यांनी चांगली फलंदाजी केली, तर सार्थक रंजनने अवघ्या १६ चेंडूंमध्ये ३७ धावांची आक्रमक खेळी साकारून सर्वांना प्रभावित केलं आहे.






