Preparation Of Wrestlers To Prevent Sanjay Singh From Contesting Election Of Wrestling Federation Sakshi Malik Bajrang Punia Visit Sports Minister Nryb
संजय सिंह यांना कुस्ती महासंघापासून दूर ठेवण्यासाठी कुस्तीपटूंनी पुकारला यल्गार; साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी घेतली क्रीडामंत्र्यांची भेट
नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकविजेते मल्ल बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सोमवारी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक लढण्यापासून रोखण्याची विनंती केली.
कुस्ती महासंघाची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडणार
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कुस्तीगिरांनी यापूर्वीही अशी विनंती क्रीडामंत्र्यांना केली होती. या वेळी त्यांनी थेट संजय सिंह यांचे नाव घेतले आहे. विविध कारणांनी लांबणीवर पडलेली भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी केले होते आंदोलन
ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचे आरोप करताना बजरंग, साक्षीसह बऱ्याच भारतीय मल्लांनी या वर्षांच्या सुरुवातीला आंदोलन केले होते. त्यांनी ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. तसेच ब्रिजभूषण यांच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती निवडणूक लढणार नाही, असे आश्वासन क्रीडामंत्र्यांकडून मिळाल्यावरच त्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
निवडणुकीती उमेदवार अनिता शेरॉन या माजी कुस्तीगीर
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संजय सिंह आणि माजी कुस्तीगीर अनिता शेरॉन यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगून बजरंग आणि साक्षी यांनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडण्यात नवे आव्हान उभे केले आहे. अनिता शेरॉन या माजी कुस्तीगीर असून २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते.
Web Title: Preparation of wrestlers to prevent sanjay singh from contesting election of wrestling federation sakshi malik bajrang punia visit sports minister nryb