
Quinton DE kock 10th Century In CPL
या सामन्यात, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा पर्याय निवडलेल्या बार्बाडोस ट्रायडंट्सची सुरुवात खराब झाली आणि ब्रँडन किंग अवघ्या २ धावांवर बाद झाला. परंतु, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ३३ वर्षीय क्विंटन डी कॉकने झॅकॅरी कार्टरसोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावा जोडून डाव सावरला. कार्टर ३६ चेंडूंमध्ये ५७ धावा करून बाद झाला.
पण दुसऱ्या टोकावर डी कॉकने संयम राखत आक्रमक फलंदाजी केली आणि ५७ चेंडूंमध्ये १०६ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि सहा जबरदस्त षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळे बार्बाडोस ट्रायडंट्सला ४ विकेट्स गमावून २१७ धावा करता आल्या. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून नसीम शाहने दोन विकेट्स घेतले, तर कर्णधार जेसन होल्डर आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
२१८ धावांचे लक्ष्य गाठताना, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स संघाने जॉन्सन चार्ल्स आणि काईल मायर्स यांच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात करून दिली. चार्ल्स आणि मायर्स यांनी १०.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ११२ धावा जोडल्या. मायर्स २९ धावांवर धावबाद झाला. दरम्यान, चार्ल्सने स्फोटक खेळी करत ४५ चेंडूंमध्ये सात षटकार आणि सहा चौकारांसह ७८ धावा केल्या.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दासुन शनाकाने २२ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांसह ३६ धावा ठोकल्या. कर्णधार जेसन होल्डरने १८ धावा केल्या. अखेरीस, आंद्रे फ्लेचरच्या ८ चेंडूंतील नाबाद २२ धावा आणि वानिंदू हसरंगाच्या ४ चेंडूंतील नाबाद १८ धावा केल्या. यांनी संघाचा विजय निश्चित केला. नेव्हिस पॅट्रियट्सने १९.१ षटकांत ४ विकेट्स गमावून २२० धावा केल्या आणि पाच चेंडू शिल्लक असताना सहा विकेट्स विजय मिळवला
जरी बार्बाडोस ट्रायडंट्स संघ सामना हरला असला तरी, क्विंटन डी कॉकने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम रचला. हे डी कॉकच्या टी-२० कारकिर्दीतील १० वे शतक होते. यासह, डी कॉक टी-२० इतिहासात १० किंवा अधिक शतके करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. यासह, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या ख्रिस गेल आणि विराट कोहली या फलंदाजांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या बाबतीत, त्याने टी-२० मध्ये १० शतके करणाऱ्या कोहली आणि डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. टी-२० इतिहासात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज गेलच्या नावावर आहे, ज्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत एकूण २२ शतके झळकावली आहेत.