साक्षी मलिकने केली निवृत्तीची घोषणा : भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून संजय सिंग ‘बबलू’ यांची निवड झाल्यानंतर साक्षी मलिक यांनी हा निर्णय घेतला आहे. साक्षीने पत्रकार परिषदेत सांगितले की, मी कुस्तीतून निवृत्ती घेत आहे.
साक्षी मलिक यांनी हा खेळ सोडण्याची घोषणा केली. संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे दीर्घकाळचे सहकारी आहेत, जे 12 वर्षे WFI प्रमुख होते. साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपचे सहा वेळा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. निवडणुकीत संजय सिंह यांना 47 पैकी 40 मते मिळाली. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदासाठी विरोधक कुस्तीपटूंची निवड झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अनिता शेओरानला केवळ सात मते मिळवता आली. देशातील अव्वल कुस्तीपटू, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी निकालाबद्दल निराशा व्यक्त केली.
काय म्हणाली विनेश फोगट?
प्रसारमाध्यमांशी बोलताना रडत रडत कॉमनवेल्थ आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगट म्हणाली, ‘आता संजय सिंग यांची फेडरेशनच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे महिला कुस्तीपटूंना छळाचा सामना करावा लागणार आहे.’ आमच्या कुस्ती कारकिर्दीचे भवितव्य अंधारात असल्याचे फोगट म्हणाले. आता कुठे जायचे हे आम्हाला माहीत नाही.