शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Duleep Trophy 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा संघाने शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये देखील भारतीय संघाने आपला दम दाखवून दिला आहे. संघाचा कर्णधार शुभमन गिलने या मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने ७५४ धावा फटकावल्या आहेत. तसेच त्याने आपल्या नेतृत्वाने देखिल सर्वांना प्रभावित केले. अशातच गिल आता मायदेशी परतला आहे. आता तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये देखील संघाचे सारथ्य करणार आहे. गिल आता बीसीसीआयने आयोजित केलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसण्याची शक्यता आहे. गिलला उत्तर क्षेत्राचा कर्णधार बनवले जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला क्वार्टरफायनल सामना २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर उत्तर क्षेत्र आणि पूर्व क्षेत्र यांच्यात खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिल यामध्ये उत्तर क्षेत्राचे नेतृत्व करताना दिसू शकतो. गिल गेल्या वर्षी दुलीप ट्रॉफीमध्ये देखील खेळला होता आणि पहिल्या सामन्यात भारत अ संघाचे सारथ्य केले होते. तथापि, त्याच्या नेतृत्वाखालील भारत अ संघला अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारत ब संघाविरुद्ध ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात खेळताना शुभमन गिलने इंडिया ब विरुद्ध पहिल्या डावात ४३ चेंडूत २५ धावा केल्या तर दुसऱ्या डावात ३५ चेंडूत २१ धावा करून तो माघारी परतला होता. दुलीप ट्रॉफी २०२४ चा पहिला सामना खेळल्यानंतर, गिलने बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मात्र चांगली कामगिरी केली होती. १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद शतक (११९) ठोकले होते.
गिल व्यतिरिक्त, भारताचा कसोटी सलामीवीर यशस्वी जयस्वाल देखील दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागाकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात जयस्वालचा पश्चिम विभाग संघात समावेश केला गेला आहे. तो आता डावखुरा फलंदाज शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. जयस्वाल व्यतिरिक्त, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड आणि सरफराज खान यांचाही पश्चिम विभाग संघात समावेश आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज तिलक वर्मा २०२५ मध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये साउथ झोनकडून खेळेल आणि संघाचे नेतृत्व देखील करणार आहे. कर्नाटकचे देवदत्त पडिकल, तामिळनाडूचे नारायण जगदीसन आणि आर. साई किशोर हे देखील साउथ झोन संघाचा समाविष्ट आहेत. तसेच यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन पूर्व झोन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या संघात ईश्वरन, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, आकाश दीप आणि रियान पराग सारखे खेळाडू असणार आहेत.