मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. याच दरम्यान, भारताची स्टार महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तिने (Veda Krishnamurthy) इंस्टाग्रामद्वारे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसला (Arjun Hoyasla) याने वेदाला प्रपोज केले असून तिला लग्नाची मागणी घातली आहे.
वेदानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अर्जुननं तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केलाय. अर्जुनच्या प्रस्तावाला वेदाने देखील होकार दर्शवला असून सध्या सोशल मीडियावर दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. वेदा आणि अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात असून महिला संघातील इतर खेळाडूंनीही वेदा कृष्णमूर्तीचं आयुष्याच्या नव्या टप्प्यासाठी अभिनंदन केलं आहे.
अर्जुन होयसलानं २०१६ मध्ये कर्नाटकसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तसेच कर्नाटक प्रीमियर लीगसह त्यानं राज्यातील इतर टी-२० स्पर्धा खेळल्या आहेत. तो २०१९ मध्ये कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये शिवमोग्गा लायन्सकडून खेळला आहे. अर्जुन होयसला हा सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. याच कामगिरीच्या जोरावर होयसला लवकरच त्याचं भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवू शकतो.
वेदा कृष्णमूर्तिने वयाच्या १८ व्या वर्षीत भारतीय संघात पदापर्ण केलं होतं. तिनं भारतासाठी आतापर्यंत एकूण ४८ एकदिवसीय आणि ७६ टी-२० सामने खेळले आहेत. वेदा ही भारतीय संघाची मधल्या फळीची फलंदाज आहे. तिनं अनेक सामन्यात गोलंदाजीही केलीय. वेदानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १९ अर्धशतक झळकावली आहेत. ७१ ही तिची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वेदानं २०२० मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेदाची सरासरी २५. ९ इतकी आहे.ती सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भाग नाही.