
Tilak Varma Sledge Vaibhav Sooryavanshi
दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने ईस्ट झोनला शानदार सुरुवात करून दिली. त्याने मोठे शॉट्स खेळले आणि त्याला अभिमन्यू ईश्वरनची चांगली साथ मिळाली. ईस्ट झोन ११ व्या षटकापर्यंत एकही विकेट घेऊ शकला नाही आणि त्यांनी वेगाने धावा करणे सुरूच ठेवले. दरम्यान, साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्लेजिंग करण्यास सुरुवात केली.
वैभव सूर्यवंशीची ईस्ट झोनच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर तिलक वर्मा मैत्रीपूर्ण विनोद करत होता. ही घटना ईस्ट झोनच्या पहिल्या डावाच्या ११ व्या षटकात घडली. तिलक वर्मा वैभव सूर्यवंशीसोबत सतत बोलत होता. त्यांच्यातील संवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंग स्टंप माइकमध्ये झाले, ज्यात तिलक वर्मा वैभवला म्हणाला, ‘काय यार, हा उपकर्णधार!’ वैभव सूर्यवंशीने मागे न हटता तिलक वर्माला प्रत्युत्तर दिले. पण त्यानंतर लगेचच परिस्थिती चिघळली. तिलक वर्मा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या दिशेने पुढे सरकला आणि त्यांनी त्याला मुक्का मारणार असा इशारा केला. वैभवही मागे हटला नाही आणि त्याने लगेचच त्याला जाब विचारला. दोघांमधील वाढता तणाव पाहून पंचांनी हस्तक्षेप करून त्या दोन खेळाडूंना वेगळे केले.
🔴POOR BEHAVIOUR BY TILAK VERMA AGAINST VAIBHAV SURYAVANSHI🤦 Tilak Varma has not done well as a captain in the first two hours of game in Duleep Trophy final. – Vaibhav & Abhimanyu Easwaran exposed his captaincy. – frustrated & lost Tilak Varma trying to break partnership by… pic.twitter.com/u8vDgfrFHA — Sam (@cricsam02) September 6, 2026
तिलक वर्मासोबत झालेल्या वादापूर्वी, वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने, अभिमन्यू ईश्वरनसोबत मिळून ईस्ट झोनला एक भक्कम सुरुवात करून दिली. या दोन फलंदाजांनी सलामीला १०० धावांची भागीदारी केली. वैभवने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एका षटकारासह ४४ धावांची वेगवान खेळी केली. मात्र, वेगवान गोलंदाज चमा मिलिंदच्या गोलंदाजीवर तो अर्धशतकापासून दूर राहिला. वैभवने एका शॉर्ट बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण अतिरिक्त बाउन्समुळे चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला लागून मिड-विकेटच्या दिशेने गेला. डीप स्क्वेअर लेगवरून धावत आलेल्या तनाय त्यागराजनने एक अप्रतिम झेल पकडून त्याचा डाव संपवला. तिलक वर्माची स्लेजिंग काही प्रमाणात प्रभावी ठरली, कारण या वादानंतर अवघ्या चार षटकांतच वैभव सूर्यवंशी बाद झाला. अभिमन्यू ईश्वरन ८६ चेंडूंत ७२ धावा करून बाद झाला, त्याला साऊथ झोनच्या देवदत्त पडिक्कलने बाद केले.