टिम सेफर्ट(फोटो-सोशल मीडिया)
Tim Seifert creates history in CPL 2025 : न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सेफर्टने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये मोठा भीम पराक्रम केला आहे. सेफर्ट ४० चेंडूतच शतक झळकवून या स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने ठोकलेले शतक या स्पर्धेत सर्वात जलद शतक ठरले आहे. असे करणारा तो पहिला परदेशी फलंदाज बनला आहे. यासोबतच, हे सीपीएलमधील संयुक्तपणे सर्वात जलद शतक देखील ठरले आहे.
सेंट लुसियाच्या ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवण्यात आलेल्या सेंट लुसिया किंग्ज आणि अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स यांच्यातील सीपीएल २०२५ च्या १८ व्या लीग सामन्यामध्ये टिम सेफर्टने फक्त ४० चेंडूंचा सामना करत शतक ठोकले आहे. सेफर्टने ५३ चेंडूत १२५ धावा केल्या त्यानंतर तो माघारी परतला. त्याच्या शानदार शतकाच्या जोरावर सेंट लुसिया किंग्जने १७.५ षटकांत फक्त चार गडी गमावून २०५ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले आहे.
हेही वाचा : Punjab flood : ‘पुराचा विध्वंस वेदनादायक..’, पंजाब पुराबाबत माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची भावुक पोस्ट
रविवारी ४० चेंडूत शतक झळकावून सेफर्टने वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. रसेलने १० ऑगस्ट २०१८ रोजी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये जमैका तल्लावाह्सकडून ट्रिनबागो नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या ४० चेंडूत शतक थोकण्याची किमया साधली होती. त्या सामन्यात २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रसेल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरला होता आणि त्याने ४९ चेंडूत नाबाद धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि १३ षटकार लगावले होते.
रविवारी झालेल्या अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सविरुद्धच्या सामन्यात सेफर्टने एकूण १० चौकार आणि ९ षटकार लगावले आहेत. या खेळीसह त्याने सीपीएलमध्ये परदेशी फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्याचा विक्रमह देखील मोडीत काढला आहे. तो आता या स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरला आहे.
टिम सेफर्टने सीपीएलमधील सर्वात जलद शतकाव्यतिरिक्त, त्याने आणखी तीन विक्रम देखील मोडीत काढले आहेत. त्याने सेंट लुसिया किंग्जकडून खेळताना त्याने एका डावात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याचा विक्रम देखील उद्ध्वस्त केला आहे. या डावात त्याने चौकार आणि षटकारांसह एकूण ९४ धावा कुटल्या आहेत. त्याने फाफ डुप्लेसिसचा विक्रम मोडला. त्याने चौकार आणि षटकारांसह ८२ धावा केल्या होत्या. याशिवाय, तो सेंट लुसियासाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील बनला आहे. त्याने एकूण ९ षटकार लगावले.