‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहरातील खेळाडूंना नवी संधी(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ऑलिम्पिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकणाऱ्या खेळाडूंच्या घडणीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मुंबई शहरातील खेळाडूंनाही मिळणार असून, या उपक्रमास जिल्हा स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा : IND W vs SL W : शफाली वर्माला खुणावतोय विश्वविक्रम! श्रीलंकेविरुद्ध 75 धावा करताच लिहिला जाईल इतिहास
या क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामध्ये बॅडमिंटन, बॉक्सिंग, शूटिंग, लॉन टेनिस आणि टेबल टेनिस या पाच खेळांचा समावेश करण्यात आला आहे. निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले जाईल. तसेच आधुनिक क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स किट, पूरक आहार, वैद्यकीय उपचार, विमा संरक्षण तसेच देशांतर्गत स्पर्धांमधील सहभागाचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्राधान्याने संधी देण्यात येणार आहे. खेळाडूंची निवड टप्याटप्याने करण्यात येईल, मुंबई शहरातील गुणवंत खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
या केंद्रासाठी इच्छुक व पात्र क्रीडा मार्गदर्शक तसेच प्रशिक्षण केंद्र चालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज २ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, सायन (पश्चिम), धारावी, मुंबई येथे करावे. अर्जदार dsomumbaicity@gmail.com या ई-मेल पत्त्यावरही अर्ज करू शकतात. या उपक्रमामुळे मुंबई शहरातील खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, ऑलिम्पिक स्तरापर्यंत मजल मारण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर (धारावी) मार्क धरमाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हेही वाचा : Cristiano Ronaldo: फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो गाठणार 1000 गोलचा टप्पा! व्यक्त केला निर्धार






