३७ वर्षीय कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली १८ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या १८ वर्षांच्या थक्क करणाऱ्या प्रवासात त्याने असे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला मोडणे कठीण आहे. विराटच्या १८ वर्षातील १८ ऐतिहासिक विक्रम कोणते, जाणून घेऊयात.
एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव फलंदाज: विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक शतके करणारा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याच्या नावावर ५४ एकदिवसीय शतके आहेत.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके: सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ११ शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. इतकेच नव्हे तर, त्याने २०१७ आणि २०१८ या सलग दोन वर्षांत हा पराक्रम केला.
एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा: विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात ७६५ धावा केल्या. एकाच विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
VIRAT KOHLI COMPLETED 18 YEARS IN INTERNATIONAL CRICKET 🐐 – Relive the greatest Knock in T20I history, King vs Pakistan in 2022 T20 World Cup. pic.twitter.com/TNPbfN8sVq — Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2026
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८ ते १४ हजार धावा: ‘रन मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८,०००, ९,०००, १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,००० धावा करण्याचा विक्रम आहे.
एका दशकात २० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा: २०११ ते २०२० या दशकात २०,००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट हा एकमेव क्रिकेटपटू आहे.
धावांचा पाठलाग करताना शतकांचा बादशाह: ‘चेस मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना २९ शतके झळकावली आहेत. यापैकी २४ शतके भारताच्या विजयांमध्ये आली.हा स्वतःच एक वेगळा विक्रम आहे.
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार: विराट कोहली हा सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार आहे. कोहलीच्या कर्णधारपदाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले, जे कोणत्याही भारतीय कर्णधाराने जिंकलेले सर्वाधिक सामने आहेत.
सर्वाधिक सामनावीर पुरस्कार: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७१ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. या एकूण संख्येत तो फक्त सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.
सर्वात जलद ७,००० कसोटी धावा: सर्वात जलद ७,००० कसोटी धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने केवळ ८१ कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके: कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक ७ कसोटी द्विशतके आहेत, जी कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेली सर्वाधिक द्विशतके आहेत.
परदेशी कसोटी मालिकेत सलग ४ शतके: परदेशी भूमीवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सलग चार शतके झळकावणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय कर्णधार: २०१७ मध्ये, विराटने श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ९३ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, जे कोणत्याही भारतीय कर्णधाराने केलेले सर्वात जलद कसोटी शतक आहे.
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतकाचा विक्रम: एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध १० शतके झळकावली आहेत.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकूण १५ शतके झळकावली असून, हा एक विक्रम आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके: विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९ शतके झळकावली असून, हा सर्वाधिक विक्रम आहे.
सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार: विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा, म्हणजेच २२ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे.
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर: विराट कोहलीने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकला आहे, जो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये ९००+ आयसीसी रेटिंग: विराट कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय या तिन्ही फॉरमॅटमध्ये ९०० पेक्षा जास्त आयसीसी रेटिंग गुण मिळवले आहेत.
Asian Games 2026 साठी अफगाणिस्तानने जाहीर केला संघ; ‘या’ खेळाडूकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा



