
WCL S3 2026 schedule IND vs PAK
ही स्पर्धा इंग्लंडबाहेर आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. युवराज सिंग, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, शाहिद आफ्रिदी, एबी डिव्हिलियर्स आणि मोईन अली यांसारखे दिग्गज खेळाडू या लीगमध्ये पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. डब्ल्यूसीएलच्या तिसऱ्या हंगामात एकूण सात संघ सहभागी होत असून, बांग्लादेश या स्पर्धेत पदार्पण करत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामनाही होणार आहे. या स्पर्धेत कधी भिडणार भारत आणि पाकिस्तान जाणून घेऊयात.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२६ ही स्पर्धा ३ ऑक्टोबर रोजी सुरू होईल. लीग टप्प्यात दररोज दोन सामने खेळले जातील. स्पर्धेतील पहिला सामना इंडिया चॅम्पियन्स आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स यांच्यात होईल. दुसरा सामना पाकिस्तान चॅम्पियन्स आणि बांग्लादेश चॅम्पियन्स यांच्यात खेळला जाईल. भारत-पाकिस्तान सामना १० ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता सुरू होईल. साखळी फेरी संपल्यानंतर, उपांत्य फेरीचे सामने १६ ऑक्टोबर रोजी शारजाह येथे खेळले जातील. अंतिम सामना १८ ऑक्टोबर रोजी शारजाह येथे उपांत्य फेरीतील विजेत्यांमध्ये खेळला जाईल. दोन सामन्यांच्या दिवशी पहिला सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० वाजता, तर दुसरा सामना रात्री ९:०० वाजता सुरू होईल.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या पहिल्या हंगामात, भारतीय चॅम्पियन्सनी पाकिस्तानी चॅम्पियन्सना हरवून विजेतेपद पटकावले. दुसऱ्या हंगामात, दक्षिण आफ्रिकन चॅम्पियन्सनी पाकिस्तानी चॅम्पियन्सना हरवून विजेतेपद मिळवले. इंग्लंडमधील दोन यशस्वी हंगामांनंतर, डब्ल्यूसीएल प्रथमच युएईमध्ये आयोजित केली जाईल. युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल.