पृथ्वी शॉ(फोटो-सोशल मीडिया)
Prithvi Shaw’s cricket career : भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ एकेकाळी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप मोठ्या शिखरावर होता. खूप कमी वयात त्याने प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या फलंदाजीच्या शैलीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु, त्याला आपला फॉर्म आणि आपली प्रसिद्धी टिकवता आली नाही आणि त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. पृथ्वी शॉची कारकीर्द उध्वस्त होण्यामागे नेमकं कारण काय? याबाबत आता रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खुलासा केला आहे.
प्रशिक्षक दिनेश लाड यांनी पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला उतरती कळा का लागली? याबाबत भाष्य केले आहे. लाड यांनी पृथ्वी शॉला जवळून खेळताना पाहिले आहे. त्याच्याबाबत बोलताना लाड म्हणाले की, वाईट गोष्टी निवडल्यामुळे पृथ्वी शॉने त्याच्या त्याचे करिअरची वाट लावून घेतली.
भारतीय अंडर-१९ संघाने २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला होता. या विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ कर्णधार राहिला आहे. तो आता संघर्षाच्या टप्प्यातून मार्गक्रमण करता आहे. तो राष्ट्रीय संघात परतण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. त्याच वेळी, त्याच अंडर-१९ विश्वचषकात, भारताचा उपकर्णधार राहिलेला शुभमन गिल मात्र मोठे यश प्राप्त करताना दिसत असून तो आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार देखील बनला आहे.
दिनेश लाड यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, “मी पृथ्वीला लहानपणापासून पाहत आलो आहे. मी त्याला १० वर्षांचा असल्यापासून खेळताना पाहिले असून तो एक अतिशय प्रतिभावान खेळाडू राहिला आहे. पण प्रत्येकाचा प्रवास वैयक्तिक असतो आणि मला माहित नाही की त्याचे काय झाले. मी अजून देखील मानतो की पृथ्वी हा एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. दुर्दैवाने, तो चुकीच्या मार्गावर गेला आणि त्याचे क्रिकेट करियर उद्ध्वस्त झाले.”
दिनेश लाड यांनी भारताच्या उदयोन्मुख खेळाडू असणाऱ्या वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांचे कौतुक केले आहे. कौतुक करताना ते म्हटले की, “भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातात असून आता आपल्याकडे अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. हे भारतीय क्रिकेटचे खरे भविष्य आहेत.”
लाड पुढे म्हणाले की, “वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत. हे खेळाडू भविष्यातील क्रिकेटपटू घडत आहेत. बते भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सज्ज होत असून भारतीय क्रिकेट जवळजवळ शीर्षस्थानी आहे.”