फोटो सौजन्य - सोशल मिडीया
सोशल मिडीया इन्फ्लुएंसर वेगवेगळ्या कारण्यासाठी Instagram, Facebook आणि X यासारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रिमिंग करतात. अनेक गेमर्सद्वारे You Tube वर त्यांच्या गेमचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाते. गेमच्या लाईव्ह स्ट्रिमिंगची तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र आता सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सामान्य वापरकर्ते आता सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर लाईव्ह स्ट्रिमिंग करू शकणार नाहीत. केवळ प्रिमियम वापरकर्त्यांनाच एक्सवर लाईव्ह स्ट्रिमिंग करता येईल. एक्सचे हे नवीन अपडेट लवकरच लागू केले जाणार आहे.
Instagram, Facebook, You Tube या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते विनामुल्य लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात. मात्र X या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी आता वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. X वर हे बदल कधी पासून लागू केले जाणार आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. X चे प्रीमियम सबस्क्रिप्शन २१५ रुपये प्रति महिना पासून सुरू होते आणि प्रीमियम + टियरसाठी वापरकर्त्यांना १,१३३ रुपये मोजावे लागतात. मात्र आता X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार असल्याने प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी देखील टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलन मस्कने X वर अनेक बदल केले आहेत. ज्यामध्ये X वर पोस्ट करणे, एखादी पोस्ट लाईक करणे, बुकमार्क आणि पोस्टला रिप्लाय करण्यासाठी वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागत आहेत. एलन मस्कच्या या घोषणेनंतर वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता एलन मस्कने आणखी एक घोषणा केली आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सचे हे नवीन अपडेट लवकरच लागू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी जरी पैसे मोजावे लागणार असेल तरी अद्याप Instagram, Facebook, You Tube या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते विनामुल्य लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतात.