
Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
रिपोर्ट्सनुसार, विवो टी 5 प्रो 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 6 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 41,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत 7 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत आता 46,999 रुपये झाली आहे. तर टॉप व्हेरिअंटच्या किंमतीत कंपनीने आणखी वाढ केली आहे.
डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत आता 69,999 रुपये झाली आहे. या किंमतीमुळे हा स्मार्टफोन आता मिड-फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये समाविष्ट झाला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन भारतात केवळ 29,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. खरं तर, अनेक टेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत स्मार्टफोनच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे बजेट फ्रेंडली आणि मिड रेंज किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी देखील आता ग्राहकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे.
विवो स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, विवो टी 5 प्रो 5G मध्ये 6.83-इंच 1.5K ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 प्रोसेसर मिळणार आहे. यासोबतच या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे.
या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 9020mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच या फोनमध्ये ओआयएससह 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. हे डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर चालते आणि पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यामध्ये IP68/IP69 रेटिंग दिली आहे.