
Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावंत परिवारातील कौटुंबिक दुराव्याला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री व आमदार प्रा. तानाजीराव सावंत (Taneji Sawant) आणि ज्येष्ठ नेते प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या परिवारातील गैरसमज दूर झाले असून, दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा सलोखा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. जि. प. सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करीत सर्व गैरसमज दूर झाले अशी पोस्ट केली आहे.
या पार्श्वभूमीवर तानाजीराव सावंत यांनी प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या परिवारातील सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिल्याचा भावनिक क्षणही पाहायला मिळाला. या भेटीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे.
सावंत परिवारातील या घडामोडीकडे केवळ कौटुंबिक पातळीवरच नव्हे, तर राजकीय वर्तुळातूनही पाहिले जात आहे. मात्र, कुटुंबातील मतभेदांपेक्षा परस्परांचे संबंध आणि कौटुंबिक सलोखा कायम ठेवण्याला प्राधान्य दिल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे. ‘कुटुंबातील नाती कोणत्याही मतभेदांपेक्षा मोठी असतात,’ असा संदेश या भेटीतून देण्यात आला. विशेषतः तानाजीराव सावंत यांनी दोन्ही भावंडांच्या खांद्यावर ठेवलेला आशीर्वादाचा हात, हा या भेटीतील भावनिक ठरलेला क्षण होता.
सावंत परिवाराचा शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील दीर्घकाळचा सहभाग लक्षात घेता, परिवारातील एकजुटीला विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांतील दुराव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता मात्र कौटुंबिक पातळीवर संवाद आणि सलोखा पुन्हा प्रस्थापित झाल्याने या चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे.
राजकारणात मतभेद आणि वेगवेगळ्या भूमिका असू शकतात; मात्र त्याचा परिणाम कौटुंबिक नात्यांवर होऊ नये, अशी भूमिका या घडामोडीतून अधोरेखित होत आहे. ‘आम्ही एकत्र होतो, एकत्र आहोत आणि सदैव एकत्र राहू,’ असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
सावंत परिवारातील ही जुळवाजुळव आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर कितपत परिणाम करते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.