गायिका आशा भोसले यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Asha Bhosle News : मुंबई : अनेक दशके बॉलिवूड आणि संगीत विश्वात आपल्या आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात धक्का बसला आहे. आशा भोसले सोशल मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांशी जोडलेल्या होत्या आणि त्यांची इंस्टाग्रामवरील शेवटची पोस्ट १८ मार्च रोजीची होती. त्या पोस्टमध्ये आशा भोसले यांनी जीवनाचा अंत आणि मुक्ती याबद्दल गहन अर्थ सांगणारे शब्द लिहिले होते, आशा भोसलेंची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बँड ‘गोरिलाझ’सोबतचा एक फोटो शेअर केला. यामध्ये, पार्श्वभूमीवर एक भारतीय वस्ती, हत्ती आणि तुटलेल्या वस्तू दिसत आहेत. फोटोमध्ये त्या शांत आणि साध्या दिसत होत्या. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “वाराणसीला जाऊन सर्वात पवित्र नदी, गंगेच्या काठाने प्रवास करताना, मी जे पाहिले ते खोलवर समजून घेतल्यावर, मला जीवनाचा अर्थ, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर मला काय करायचे आहे हे समजले.” त्यांनी आपल्या संगीताच्या सरावाची तुलना जीवनाची नदी पार करण्यास मदत करणाऱ्या नावाड्यास केली आहे.
हे देखील वाचा : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक
आशा भोसले आध्यात्मिकदृष्ट्या तयार
आशा भोसले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असेही लिहिले होते, “जेव्हा मी नदीच्या पलीकडे पोहोचेन, तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष मिळेल आणि आपल्या सभोवताली तरंगणाऱ्या हजारो आवाजांचा मी एक भाग बनेन.” या शब्दांवरून असे दिसून आले की, त्या त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या तयार होत्या. त्यांनी असेही म्हटले होते की, त्या निसर्गाशी एकरूप होण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांच्या ‘द शॅडोई लाईट’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संपूर्ण वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : Asha Bhosle फक्त गायिका नाही तर बिझनेसवुमन; दुबई अन् लंडनमध्ये व्यवसाय, तर कोट्यवधींची संपत्ती
गायनविश्वासाठी एका युगाचा अंत.
ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मते, अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांची नात, जनाई भोसले यांनी या दुःखद काळात कुटुंबाला एकांत मिळावा असे आवाहन केले आहे. आशा भोसले यांच्यावर सोमवारी दुपारी ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय थाटामाटात अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांचे निधन हे मनोरंजन आणि गायन जगतासाठी एक मोठे नुकसान आहे.






