श्रीलंकेत कार रेसिंग स्पर्धेदरम्यान मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू; 23 जखमी

श्रीलंकेतील उवा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे कार रेसिंग दरम्यान झालेल्या अपघातात एका मुलासह किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

    श्रीलंकेतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंकेतील (Sri Lanka) उवा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार रेसिंग (Car Racing) दरम्यान झालेल्या अपघातात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सेंट्रल हिल रिसॉर्टमध्ये कार रेसिंग दरम्यान कारचे नियंत्रण सुटल्याने, कार रस्त्यावरुन खाली प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या लोकांमध्ये ही कार घुसली.

    या अपघातात २३ जण गंभीर जखमी झाले असून सात जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांमध्ये आठ वर्षांचा मुलगा आणि चार ट्रॅक असिस्टंटचाही समावेश आहे. या घटनेनंतर 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

    एप्रिलच्या मध्यात येणाऱ्या राष्ट्रीय नवीन वर्षाच्या अनुषंगाने श्रीलंकेच्या लष्कराने आयोजित केलेल्या ‘फॉक्सहिलसुपर क्रॉस 2024’ या नावाने ही शर्यत पाहण्यासाठी लाखाहून अधिक लोकं जमले होते. ही शर्यत श्रीलंकेच्या मध्यवर्ती उच्च प्रदेशातील दियातलावा या पूर्वीच्या गॅरिसन शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, जिथे सर्व सैनिक लष्करी प्रशिक्षण घेतात. नवीन वर्षाच्या सुट्टीच्या काळात सेंट्रल हिल्समध्ये हॉलिडेमेकर जमतात. जिथे कार रेस, घोड्यांच्या शर्यती अशा अनेक स्पर्धा होतात.

    श्रीलंकेच्या लष्कराने 2019 मध्ये ‘फॉक्सहिल’ शर्यतीचे शेवटचे आयोजन केले होते, परंतु देशभरात 2019 च्या इस्टर हल्ल्यानंतर ती अचानक थांबवावी लागली. पाच वर्षांनंतर ही शर्यत पुन्हा आयोजित करण्यात आली होती, मात्र रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर ती पुन्हा स्थगित करण्यात आली.