संग्रहित फोटो
पुणे : नसरापूर येथील लैंगिक अत्याचार व हत्येतील चिमुरडीचा मृत्यू श्वास रोखला गेल्याने तिला मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. आरोपीने चिमुरडीच्या घशात मोजा कोंबल्याने तिचा श्वास रोखला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चिमुरडीच्या शरीरावर दुखापतींच्या खुणा आढळल्या असून, नाकातून रक्तस्राव झाल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात (दि. १ मे) घडलेल्या साडे तीन वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार व हत्येने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. चिमुरडीचा मृतदेह आढळल्यानंतर तिचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात करण्यात आले. त्याचा अहवाल आताच पोलिसांना प्राप्त झाला आहे.
अहवालानुसार, चिमुरडीच्या घशात जबरदस्तीने मोजा कोंबल्याने तिचा श्वास अडला. श्वास घेता न आल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात ‘अस्फिक्सिया’ म्हणजेच श्वसन बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर विविध दुखापतींच्या खुणाही आढळून आल्या आहेत. घटनेनंतर तिच्या नाकातून रक्त येत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
याप्रकरणात पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, काही साक्षीदारांचे जबाब अद्याप नोंदवायचे आहेत. उर्वरित साक्षीदारांकडून आरोपीसमोर ओळख आणि पडताळणी प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच घटनास्थळावरील आणि इतर ठिकाणांवरील विविध पुराव्यांची आरोपीसमोर पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तपास
तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करण्यात येत असून, मोबाईलची माहिती, हालचाली, संपर्क व इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक तपासही सखोलपणे सुरू आहे. हा गुन्हा पूर्वनियोजित होता का, आरोपीने यासाठी आधीपासून काही तयारी केली होती का, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी विविध पुरावे गोळा केले असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल






