
Minneapolis apartment shooting 2026 Minneapolis shooting today
अमेरिकेतील (America) शस्त्र संस्कृती आणि हिंसाचाराचा भीषण चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. बुधवारी संध्याकाळी मिनियापोलिस (Minneapolis) शहराच्या मध्यवर्ती भागातील एका बहुमजली अपार्टमेंट इमारतीमध्ये अचानक झालेल्या प्राणघातक गोळीबाराने थरकाप उडवला. या भीषण हिंसेत बंदूकधाऱ्या संशयितासह ३ जणांना आपला जीव गमवावा लागला असून तीन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फॉरेन्सिक टीम आणि विशेष पोलीस दलाने संपूर्ण इमारतीची नाकेबंदी करून सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बुधवारी दुपारी ४:३० च्या सुमारास मिनियापोलिस पोलीस विभागाला ९११ आपत्कालीन क्रमांकावर इमारतीत गोळीबार सुरू असल्याचा फोन आला. आणीबाणीची परिस्थिती ओळखून पोलीस पथक अवघ्या तीन मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच अधिकाऱ्यांना अनेक जखमी नागरिक विव्हळताना दिसले. त्याच वेळी वरच्या मजल्यांवरून सलग गोळीबाराचे आवाज येत असल्याने पोलीस अधिकारी तातडीने पायऱ्यांवरून वरच्या मजल्याकडे धावले. मात्र, वरच्या मजल्यावर इतका धूर आणि धुके पसरले होते की, दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. या अत्यंत धोकादायक आणि धुरकट परिस्थितीतही पोलिसांनी प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष कारवाई सुरू ठेवली.
या धक्कादायक घटनेने इमारतीतील रहिवाशांमध्ये तीव्र घबराट पसरली. घटनेच्या वेळी इमारतीच्या बाहेर बसलेले प्रत्यक्षदर्शी ज्युलियस बेली यांनी सांगितले की, “मी शांतपणे बाहेर बसलो होतो, तेव्हा अचानक एकापाठोपाठ एक सलग आठ गोळ्यांचे आवाज आले. त्याच वेळी एका महिलेची अत्यंत वेदनादायक किंकाळी ऐकू आली.” बेली यांनी पुढे सांगितले की, त्यांनी हातात पिस्तूल घेतलेल्या एका माणसाला धावताना पाहिले, जो याच इमारतीचा रहिवासी होता. संशयित व्यक्ती परिसरात वारंवार स्वतःजवळील शस्त्रे दाखवून लोकांना घाबरवत असे. बेली यांनी जून महिन्यात या अपार्टमेंटमध्ये मुक्काम ठोकला होता आणि ते नेहमी या संशयितापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China : ड्रॅगनने दडवले तिबेटच्या शोकांतिकेचे सत्य; सेन्सॉरशिप ठरली आपत्ती, ‘RSF’ कडून चिनी डिजिटल नाकेबंदीचा पर्दाफाश
त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे दुसरे रहिवासी ख्रिस मिलर यांनीही गोळीबाराचा भयानक आवाज ऐकताच बाहेर पळ काढला. मिलर यांनी पोलिसांना सांगितले की, गोळीबार कोणी केला असावा याचा त्यांना त्वरित अंदाज आला, कारण या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांची आणि संशयिताची इमारतीच्या पॅसेजमध्ये (Hallway) गाठ पडली होती. त्यावेळी संशयिताच्या हातात उघडपणे बंदूक होती. मिलर यांनी या गंभीर प्रकाराबाबत इमारतीच्या व्यवस्थापनाकडे (Apartment Management) अधिकृत तक्रारही नोंदवली होती. मात्र, या तक्रारीवर योग्य वेळी कडक कारवाई न झाल्यानेच ही भीषण दुर्घटना घडल्याचा संताप रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.
पोलीस सार्जंट गॅरेट पार्टेन यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गोळीबारात एका पीडिताचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमी नागरिकाचा हेनेपिन काउंटी मेडिकल सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयित हल्लेखोरही ठार झाला असून, त्याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाला की त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, याची अधिकृत परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
या कारवाईदरम्यान तीन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. यातील दोघांना थेट गोळ्या लागल्या असून, एका अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागली आहे. दुसऱ्या एका अधिकाऱ्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिसऱ्या अधिकाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. वैद्यकीय सूत्रांनुसार, जखमी झालेल्या तिन्ही पोलिसांची प्रकृती सध्या स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. अमेरिकन एफबीआय (FBI) आणि स्थानिक पोलीस दल या सामूहिक गोळीबारामागच्या मुख्य कारणाचा सखोल तपास करत आहेत.