कराची : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची कोणताही अधिकृत समोर नाही. दाऊदची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कराचीतील रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अदनान अहमद उर्फ अबू हंजला याच्यासह वॉन्टेड दहशतवादी मारले गेले असताना दाऊदवर विषप्रयोग केल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी कुणाकडूनच करण्यात आलेली नाही. या प्रकारामुळे डी कंपनीचे धाबे दणाणले आहे. डी-कंपनीचा प्रमुख दाऊद इब्राहिम अनेक दशकांपासून भारतातून फरार आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्याच्या कथित सहभागामुळे त्याला भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित करण्यात आले. भारताने कराचीत त्याच्या उपस्थितीचे पुरावे सादर करूनही पाकिस्तानने त्याला आश्रय नाकारला.