Measles vaccine : बांगलादेशात गोवराचा उद्रेक, 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण, भारताबाबत काय परिस्थिती?, सौजन्य : आयएएनएस
सुदैवाने हा संसर्ग सध्या बांगलादेशातील काही जिल्ह्यांमध्ये सुरू असून सीमावर्ती भागापर्यंत तो पोहचला नाहीय. त्यामुळे भारतात त्याचा कोणताच परिणाम जाणवत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बांगलादेशच्या ‘द डेली स्टार’मधील वृत्तानुसार, सप्टेंबर 2025 मध्ये अंतरिम सरकारने युनिसेफच्या माध्यमातून लस खरेदी थांबवून खुल्या निविदा प्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. मात्र, या प्रक्रियेला विलंब झाल्याने लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि नियमित लसीकरण मोहिमेला फटका बसला.
‘सायन्स डॉट ओआरजी’च्या अहवालाचा हवाला देत ‘द डेली स्टार’ने म्हटले आहे की, लस खरेदी थांबवल्याने नियमित लसीकरणात अडथळा निर्माण होऊन गोवरचा पसार होण्याचा धोका आधीच व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वी बांगलादेश सरकार गोवर आणि रुबेला लसीच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात युनिसेफवर अवलंबून होते.
या आजाराचा संसर्ग जानेवारीमध्ये म्यानमार सीमेजवळील रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये सुरू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गोवराचा संसर्ग देशातील 64 पैकी 58 जिल्ह्यांमध्ये पोहोचला. 21 हजारांहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
सरकारी आकडेवारीनुसार, 2025 मध्ये गोवराची लस घेण्यासाठी पात्र असलेल्या मुलांपैकी केवळ 59 टक्के मुलांचे लसीकरण झाले होते. मात्र, नंतर ही आकडेवारी अधिकृत वेबसाइटवरून हटवण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे. निविदा प्रक्रियेतील प्रशासकीय विलंबामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाला आणि नियमित लसीकरणावर परिणाम झाला.
IEDCRचे माजी प्रिन्सिपल सायंटिस्ट एएसएम आलमगीर यांनी 2024 पासून व्हिटॅमिन ए वितरण मोहिमेला आलेल्या अपयशामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता आणखी कमी झाल्याचे म्हटले आहे.
DGHSमधील रोग नियंत्रण विभागाचे माजी संचालक बे-नजीर अहमद यांच्या मते, बांगलादेशने एप्रिलमध्ये युनिसेफच्या माध्यमातून पुन्हा लस खरेदी सुरू केली. तसेच आपत्कालीन लसीकरण मोहीमही राबवण्यात आली. मात्र, गोवराचा फैलाव ज्या वेगाने होत आहे, ते पाहता परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी वेळ लागू शकतो.
दरम्यान, लस खरेदीतील कथित अनियमितता आणि अपयशाबाबत सुप्रीम कोर्टातील वकील बिप्लब कुमार दास यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशच्या ‘कव्हरेज इव्हॅल्युएशन सर्व्हे 2026’ नुसार, गोवर-रुबेलाच्या पहिल्या डोसचे लसीकरण 2019 मधील 88.6 टक्क्यांवरून 2023 मध्ये 86 टक्क्यांवर आले. दुसऱ्या डोसचे कव्हरेजही याच काळात 89 टक्क्यांवरून 80.7 टक्क्यांवर घसरले. गोवराचा प्रसार रोखण्यासाठी साधारणपणे 95 टक्क्यांपर्यंत लसीकरण कव्हरेज आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.






