
bangladesh president mohammed shahabuddin resigns hafizuddin ahmed acting president
दक्षिण आशियातील शेजारील देश बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा राजकीय थरार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी एका मोठ्या धक्कादायक आणि ऐतिहासिक घडामोडीमध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammed Shahabuddin) यांनी आपल्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘प्रथम आलो’ (Prothom Alo) आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संसदेचे अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद (Hafizuddin Ahmed) यांनी त्यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला आहे. या राजीनाम्यामुळे बांगलादेशच्या सत्ताकारणात आणि घटनात्मक चौकटीत पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ७६ वर्षीय राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत ढाक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी बंगभवन (Bangabhaban – राष्ट्रपती निवासस्थान) येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची आपली मानसिक तयारी दर्शवली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सहीचे पत्र अध्यक्षांकडे सुपूर्द केले. आपल्या राजीनामा पत्रात शहाबुद्दीन यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून ते विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदार पदाची कर्तव्ये शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या पार पाडणे त्यांच्यासाठी अशक्य बनले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द
बांगलादेशच्या संविधानातील कलम ५० (३) नुसार, राष्ट्रपतींना आपल्या स्वतःच्या स्वाक्षरीने अध्यक्षांना (Speaker) उद्देशून पत्र लिहून पदाचा राजीनामा देण्याचा पूर्ण अधिकार आहे. याशिवाय, संविधानाच्या कलम ५४ मधील स्पष्ट तरतुदीनुसार, जेव्हा राष्ट्रपतींचे पद त्यांच्या मृत्यू, आजारपण किंवा राजीनाम्यामुळे रिक्त होते, तेव्हा नवीन राष्ट्रपतींची रीतसर निवड होईपर्यंत संसदेचे अध्यक्ष देशाचे ‘प्रभारी राष्ट्रपती’ (Acting President) म्हणून सर्व घटनात्मक कार्यभार सांभाळतात. त्यानुसार अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद यांनी आता देशाच्या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
संविधानाच्या कलम १२३ (२) अंतर्गत राष्ट्रपती पद रिक्त झाल्याच्या तारखेपासून पुढील ९० दिवसांच्या आत नवीन राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. तसेच कलम ४८ (१) नुसार बांगलादेशच्या राष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या (Members of Parliament) मतदानाद्वारे केली जाते. सध्या बांगलादेशच्या राष्ट्रीय संसदेत बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) कडे स्पष्ट आणि भक्कम बहुमत असल्याने, बीएनपीचाच वरिष्ठ नेता देशाचा नवा राष्ट्रपती बनणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Erbil Strike: इराकमधील अमेरिकी तळाजवळ 7 मोठे स्फोट; संपूर्ण मध्य पूर्वेत हाय-अलर्ट, US-Iran संघर्षाने जागतिक बाजारात धुमाकूळ
मोहम्मद शहाबुद्दीन यांनी २४ एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन शेख हसीना यांच्या आवामी लीग सरकारच्या कार्यकाळात बांगलादेशचे २२ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ एप्रिल २०२८ मध्ये पूर्ण होणार होता, परंतु त्यांनी जवळपास अडीच वर्षे आधीच आपल्या पदाचा त्याग केला आहे. जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका रक्तरंजित जनउठावामुळे शेख हसीना सरकार कोसळले आणि शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. या ऐतिहासिक सत्तांतरानंतरही शहाबुद्दीन हे आपल्या पदावर कायम राहिलेले आवामी लीग काळातील एकमेव उच्च घटनात्मक अधिकारी होते. मात्र, शेख हसीना सरकार पडल्यापासूनच विरोधी राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांकडून शहाबुद्दीन यांच्या नैतिकतेवर आणि राजकीय तटस्थतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. १३ व्या राष्ट्रीय विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या नवीन राजकीय समीकरणांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोर धरू लागली होती, ज्याचा शेवट आजच्या या राजीनाम्याने झाला आहे.