Bangladesh : बांगलादेशात पुन्हा हिंदू श्रद्धेला धक्का! दुर्गापूजेपूर्वी ७ मूर्तींची तोडफोड; परिस्थिती २००१ च्या भयावह हिंसेसारखी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
बांगलादेशात (Bangladesh) अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर येथील जामुर्की पश्चिमपाडा परिसरात एका ऐतिहासिक मंदिरात दुर्गापूजेच्या तोंडावर मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात भीती आणि संतापाचे सावट पसरले असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जामुर्की आर्य समितीच्या वतीने या मंदिरात गेल्या सुमारे ८५ वर्षांपासून सातत्याने दुर्गापूजेचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या पूजेसाठी मंदिरात जय्यत तयारी सुरू होती. मुख्य देवी दुर्गासह सात मूर्तींचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले होते आणि केवळ रंगकामाचे अंतिम काम बाकी होते. मात्र, बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात समाजकंटकांनी मंदिरात घुसून निर्माणाधीन मूर्तींचे अंशतः नुकसान केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sheikh Hasina: ‘विमान उतरू दिले नसते तर…’ शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीदरम्यान भारताचे ढाक्यात अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य
जामुर्की आर्य समितीचे अध्यक्ष प्रकाश बकली यांनी सांगितले की, “आम्ही बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत मंदिरातच कामाची पाहणी करत होतो आणि त्यानंतर घरी गेलो. गुरुवारी सकाळी मंदिरात परत आल्यावर आम्हाला मूर्ती फुटलेल्या अवस्थेत आढळल्या.” त्यांनी पुढे सांगितले की, हे कृत्य कोणी केले याबाबत अद्याप माहिती नसून पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक आयोजकांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच टांगेलचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अदनान मुस्तफिज यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, काही मूर्तींचे अंशतः नुकसान झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
BREAKING 🚨 🇧🇩 : Today in Mirzapur, Tangail, Bangladesh,Muslims vandalized a Durga idol of Hindus…. With only a few days left before Durga Puja, Muslims have sent a message by vandalizing the idol that Hindus will not be allowed to celebrate Durga Puja here… https://t.co/6UKKeLlPmZ — Bangladeshi Hindus Community🚨🇧🇩 (@Hindubd49346) October 1, 2026
credit – social media and Twitter
बांगलादेशात मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात फरिदपूर शहरातील उत्तर कालीबारी मंदिरातून देवी कालीची मूर्ती आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेत अंदाजे ७ ते ८ तोळे सोन्याचे दागिने, भगवान विष्णू, राधा-कृष्ण व मनसा देवीच्या पितळेच्या मूर्ती आणि शिवलिंगावरील चांदीचा साप चोरीला गेला होता. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत ऐरणीवर आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bermuda: आकाशात वादळ अन् वीज गूल! बर्म्युडाहून बोस्टनला जाणारे विमान 24 हजार फुटांवरून कोसळले थेट समुद्रात; 6 जण बेपत्ता
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील राजकीय वातावरणही तापले आहे. अवामी लीग पक्षाने या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया देत देशातील सद्यपरिस्थितीची तुलना २००१ ते २००६ दरम्यानच्या बीएनपी-जमात-ए-इस्लामी आघाडी सरकारच्या कार्यकाळाशी केली आहे. त्या काळात अल्पसंख्याकांविरुद्ध झालेल्या हिंसेची पुनरावृत्ती आता होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. मंदिरांवर हल्ले, घरांची जाळपोळ, जमिनी बळकावणे आणि हिंदूंना देश सोडण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे अवामी लीगने म्हटले आहे. बांगलादेशातील हिंदू समुदाय सध्या या सर्व प्रकारांमुळे अत्यंत चिंतेत असून प्रशासनाकडून ठोस आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपायांची मागणी केली जात आहे.






