
Earthquake prediction China Brazil Seismology research accuracy 2026
निसर्गाच्या सर्वात भयानक आणि विनाशकारी आपत्तींपैकी एक म्हणजे भूकंप. (Earthquake Prediction) अचानक येणारे भूकंपाचे धक्के काही सेकंदांत हसती-खेळती शहरे उद्ध्वस्त करतात आणि हजारो निष्पाप जीवांचा बळी घेतात. जगभरात दरवर्षी भूकंपाशी संबंधित घटनांमुळे सुमारे ४०,००० लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या जीवितहानीमागील सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे भूकंपाचा अचूक अंदाज बांधण्याची कोणतीही खात्रीशीर यंत्रणा आतापर्यंत उपलब्ध नसणे हेच होते. हवामानाचा अंदाज जसा काही दिवस आधी बांधता येतो, तसा भूकंपाचा अंदाज बांधणे अशक्य मानले जात होते. मात्र, एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनाने या धारणेला छेद दिला असून संपूर्ण जगासाठी आशेचा एक नवा किरण दाखवला आहे.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, चीनच्या नेतृत्वाखालील आणि ब्राझील तसेच तैवानमधील भूगर्भशास्त्रज्ञांच्या संयुक्त चमूने भूकंपाच्या पूर्वसूचनेबाबत एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या शास्त्रज्ञांनी २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत जगातील विविध १२ ठिकाणच्या संभाव्य भूकंपांचे आगाऊ भाकीत केले होते. अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या १२ पैकी १० ठिकाणी भाकीत केल्यापासून अवघ्या तीन महिन्यांच्या आत प्रत्यक्षात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. म्हणजेच या संशोधकांची अचूकता दर सुमारे ८३ टक्के नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात केंद्रबिंदू (Epicenter) असेल असे भाकीत केले गेले होते, नेमक्या त्याच भागात हे भूकंप झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर
भूकंप ही अचानक किंवा अनपेक्षित घडणारी घटना नसून ती पृथ्वीच्या पोटात प्रदीर्घ काळापासून घडणाऱ्या भूगर्भीय घडामोडींचा परिणाम असते, असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. हा अंदाज बांधण्यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूने अत्यंत प्रगत शास्त्रीय उपकरणांचा एकत्रित वापर केला. त्यांनी जमिनीखालील सूक्ष्म लहरी मोजण्यासाठी सिस्मोमीटर (Seismometer), पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदल टिपण्यासाठी मॅग्नेटोमीटर (Magnetometer) आणि जमिनीच्या पृष्ठभागावरील अगदी उप-मिलिमीटर हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) रिसीव्हर्सचा वापर केला.
चेंगडू विद्यापीठाचे प्राध्यापक चेन चिएह-हंग यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन पूर्ण झाले. प्रा. चेन यांच्या मते, जगातील एकूण भूकंपांपैकी सुमारे एक तृतीयांश भूकंप हे एकट्या चीन आणि त्याच्या आसपासच्या भूगर्भीय प्लेट्सच्या हद्दीत होतात. त्यामुळे डेटा गोळा करण्यासाठी हे क्षेत्र अत्यंत उपयुक्त ठरले. पृथ्वीच्या पोटात मोठा भूकंप होण्यापूर्वी खडक तुटतात, चुंबकीय क्षेत्रात सूक्ष्म बदल होतात आणि जमिनीच्या वरच्या थरात हलकी विस्थापने होतात. या उपकरणांच्या सहाय्याने मिळालेल्या डेटाचे सखोल विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी तीन महिने आधीच धोक्याचा इशारा दिला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Earthquake: रशियातील कामचत्का येथे भूकंपाचे जोरदार धक्के; 152 किमी खोल केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंप रोखणे मानवाच्या हातात नाही, परंतु जर भूकंपाची अचूक वेळ आणि केंद्रबिंदू आधीच समजला, तर होणारी अथांग जीवितहानी आणि वित्तहानी लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकते. जर तीन महिने किंवा काही आठवडे आधी भूकंपाचा धोका असलेला परिसर निश्चित झाला, तर स्थानिक प्रशासनाला नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी, धोकादायक इमारती रिकामा करण्यासाठी आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो.
जरी या संशोधनाने ८३ टक्के अचूकता गाठली असली, तरी प्रा. चेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते अजून बरेच संशोधन बाकी आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाद्वारे आपण संभाव्य धोका असलेला विस्तृत भूभाग आणि ढोबळ कालावधी निश्चित करू शकतो, परंतु अगदी अचूक दिवस किंवा वेळ ठरवणे अजूनही आव्हानात्मक आहे. असे असले तरी, “भूकंपाचे भाकीत करणे पूर्णपणे अशक्य आहे” ही जुनी वैज्ञानिक धारणा आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे, हे या संशोधनाने सिद्ध केले आहे.