China News: अण्वस्त्रांच्या शर्यतीत चीनची मोठी झेप; SIPRIअहवालात धक्कादायक आकडेवारी उघड
China News: चीन अणुऊर्जेच्या शर्यतीत मोठी झेप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भत एक अहवालही समोर आला आहे. संपूर्ण जग हवामान बदल आणि जागतिक मंदीशी झुंजत असताना, चीन शांतपणे आपले अणुबॉम्ब मजबूत करत आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अलीकडील अहवालानुसार, चीनचा अणुबॉम्ब साठा आता वेगाने वाढत आहे.
SIPRI च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये चीनकडे ४१० अणुबॉम्ब होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ५०० वर पोहोचली. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, फक्त एका वर्षात चीनकडे जवळजवळ १०० नवीन अणुबॉम्बची भर पडली आहे आणि ही वाढ वेगाने होत आहे. २०२५ च्या प्राथमिक आकडेवारीवरून हा आकडा आणखी वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
याचा परिणाम केवळ आशियाच नाही तर संपूर्ण जगाच्या धोरणात्मक संतुलनावर होऊ शकतो. अमेरिका, रशिया, भारत आणि यांसारखे इतर अणुबॉम्ब असणारे आत देश आता चीनच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारतासाठी हा इशारा मानला जात आहे. भारताला सुरक्षा आणि अणुधोरणाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. चीनने “प्रथम वापर नाही” या आपल्या धोरणाचा जाहीरपणे पुनरुच्चार केला असला तरी, त्याच्या वेगाने वाढणाऱ्या अणुऊर्जेमुळे हे धोरण प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
चीनने १९५५ मध्ये अधिकृतपणे आपला अणुशस्त्र कार्यक्रम सुरू केला, ज्याला “प्रोजेक्ट ५९६” असे नाव देण्यात आले होते. त्याला सोव्हिएत युनियनकडून प्रारंभिक तांत्रिक मदत मिळाली. त्यानंतर, १९६४ मध्ये, चीनने पहिली अणुचाचणी यशस्वीरित्या केली. ही चाचणी लोप नूर येथे घेण्यात आली आणि ती विखंडन-आधारित अणुबॉम्ब चाचणी होती.
या यशस्वी चाचणीसह, चीन अमेरिका, सोव्हिएत युनियन, ब्रिटन आणि फ्रान्सनंतर जगातील पाचवा अणुसज्ज देश बनला. त्यानंतर चीनने १९६४ ते १९९६ या तीन दशकांत लोप नूर येथे ४५ अणुचाचण्या केल्या.
चीनने क्षेपणास्त्र-आधारित अणुशस्त्रांच्या विकास आणि चाचणी प्रक्रियेला गती दिली आहे. या काळात आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM) तसेच पाणबुडी-प्रक्षेपित क्षेपणास्त्र प्रणालींची निर्मिती करण्यात आली आहे. चीनने व्यापक अणुचाचणी-बंदी करारावर (CTBT) स्वाक्षरी केली असली तरी, त्याला अद्याप मान्यता दिलेली नाही.
२०२० पासून चीनच्या अण्वस्त्र साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. SIPRI (स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था) आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, सध्याच्या वाढीचा वेग कायम राहिला, तर २०३५ पर्यंत चीनकडे १,५०० पेक्षा अधिक अणु वॉरहेड्स असू शकतात.
SIPRI च्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, चीन सुमारे ३५० नवीन क्षेपणास्त्र सायलो बांधत आहे, ज्यापैकी अनेक पूर्ण झाले असून काही अद्याप बांधकामाधीन आहेत.