
CJI Suryakant, London News, Birk beck University, Indian High Commission, Supreme Court,
CJI Suryakant London News: भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या लंडन येथील व्याख्यानाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. ४ जून रोजी लंडनच्या बर्कबेक विद्यापीठात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायदा’ या विषयावरील व्याख्यानानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संचालकांना सत्र थांबवावे लागले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने नंतर या गदारोळाचा निषेध केला.
खरतंर सीजेआय सुर्यकांत यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुणांना ‘झुरळ’ संबोधत त्यांच्यावर उपहासात्मक टिका केली होती. त्याच मुद्द्यावरून लंडनमंधील विद्यार्थ्यांनी भारतातील तरुणांबाबत केलेल्या ‘झुरळ’ वक्तव्यावर आणि भारतातील असंतोषाच्या आवाजावर प्रश्न उपस्थित केल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. त्यांच्या याच विधानावरुन विद्यार्थ्यांनी सुर्यकांत यांना प्रश्न विचारत घेराव घातला.
व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, एका महिलेने भारतातील असंतोष दडपण्याच्या उपाययोजना आणि सीजेआय यांच्या अलीकडील वक्तव्यांबद्दल सूर्यकांत यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये, एक विद्यार्थीनी असे म्हणताना ऐकू येते, “आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कायदेतज्ज्ञांकडून ऐकत आहोत की, भारतात असंतोषाला वाढता विरोध होत आहे आणि हा विरोध तुमच्या भाषणात काही प्रमाणात दिसून येतो.” संचालकांनी तिला मध्येच थांबवल्यामुळे ती महिला आपला प्रश्न पूर्णही करू शकली नाही.
दरम्यान, कार्यक्रमातील एका दुसऱ्या सहभागीने सरन्यायाधीशांना १५ मे रोजी भारतात केलेल्या त्यांच्या तरुणांबाबक केलेल्या ‘कॉकरोच’च्या टिप्पणीबद्दल प्रश्न विचारला. पण त्याचवेळी कार्यक्रमांच्या संचालकांनी महिलेला थांबवले आणि म्हणाले की “आदरपूर्वक सांगतो, मी हा प्रश्न घेऊ शकत नाही कारण आपला विषय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित आहे.”
संचालकांच्या या प्रतिक्रीयेनंतर कार्यक्रमातील काही लोकांनी उभे राहत निषेध केला. आयोजकांनी प्रेक्षकांना शांतता राखण्याचे वारंवार आवाहन केले. एका क्लिपमध्ये, एक व्यक्ती “कृपया शांत व्हा, आपण हे इथेच संपवूया,” असे म्हणताना ऐकू आले.
या गोंधळानंतर लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने या प्रकाराचा निषेध केला. शुक्रवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत होता, परंतु एका व्यक्तीने त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. उच्चायुक्तालयाने याला असभ्य वर्तन म्हटले आणि सांगितले की लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु ते सभ्य आणि आदरपूर्वक पद्धतीने व्यक्त केले पाहिजेत.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला असून, त्यातूनच ‘झुरळ जनता पार्टी’ (CJP) नावाची ऑनलाइन चळवळ उदयास आली आहे. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांवर ही चळवळ सध्या सक्रिय होताना दिसत आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘झुरळ जनता पार्टी’ (CJP) नावाची एक ऑनलाइन चळवळ सुरू करण्यात आली. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मने अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली. चळवळीच्या कार्यकर्त्यांनी न्यायमूर्तींच्या वक्तव्याचा संदर्भ घेत बेरोजगारी, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, स्पर्धा परीक्षा आणि संस्थात्मक उत्तरदायित्व यांसारख्या मुद्द्यांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली.
सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी लंडनमधून काही व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर प्रसारित केले असून, त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नीट पेपरफुटी प्रकरण, सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षांमधील कथित अनियमितता आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
चळवळीचे प्रमुख अभिजीत दीपके हे अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले असून, आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या नागरिकांनी तिरंगा ध्वज सोबत आणावा, असेही आयोजकांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘झुरळ’ टिप्पणीवरून सुरू झालेला वाद आता केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित न राहता बेरोजगारी, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवरील व्यापक चर्चेचे रूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.