How were India-US relations before Trump's return Know the policies of previous US Presidents
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (20 जानेवारी 2025) अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहे. सध्या त्यांच्या शपथविधीची चर्चा जोरदार सुरु असून वॉशिंगटन डीसी येथे हा सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी त्यांनी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषावले होते. अधिकृत शपथविधी सोहळा 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता) होईल. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स ट्रम्प यांना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी पदाची शपथ देणार आहेत.
दरम्यान भारत-अमेरिका संबंध ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कसे असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दशकांत अमेरिका आणि भारत यांचे संबंध विविध टप्प्यांतून गेले असून उंचावले आहेत. ट्रम्प यांनी नेहमीच नरेंद्र मोदींना आपले चांगले मित्र म्हटले आहे. मात्र, त्यांचे भारतासोबतचे धोरण नेहमीच मैत्रीपूर्ण नव्हते. एवढेच नव्हे तर प्रत्येक अमेरिकन अध्यक्षांचे भारतासोबतचे संबंध नेहमीच एकप्रकारे नव्हते. आज आपण रिचर्ड निक्सन यांच्या भारताला विरोधापासून ते बराक ओबामा यांच्या मैत्रीपूर्ण धोरणांबद्दल जाणून घेणार आहोत.
रिचर्ड निक्सन (1969-1974)
अमेरिकेच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा होता. आज भारत-अमेरिका संबंध मैत्रीपूर्ण आहे मात्र, रिचर्ड निक्सन यांचा कार्यकाळ भारतासाठी तणावपूर्ण होता. त्यांनी पाकिस्तानला प्राधान्य दिले आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारताला धमकावण्यासाठी बंगालच्या उपसागरात नौदल पाठवले. 1974 च्या भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर त्यांनी भारतावर कठोर निर्बंध लादले होते. त्यांचा भारताबद्दलचा वैयक्तिक दृष्टीकोनही नकारात्मक होता. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि महिलांबद्दल अनेक आक्षेपहार्य विधाने केली होती. त्यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांतील संबंधामध्ये कोणतीही सुधारणा झाली नव्हती.
जिमी कार्टर (1977-1981)
कार्टर यांनी 1971 च्या युद्धानंतर बिघडलेल्या संबंधांना सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताला आर्थिक सहकार्य दिले, पण भारत-रशिया जवळिकीमुळे त्यांचे धोरण मर्यादित राहिले. मात्र, याच दरम्यान भारत-रशियातील वाढते संबंधांमुळे त्यांना बोचत राहिले.
रोनाल्ड रीगन (1981-1989)
रोनाल्ड रीगन यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध सुधारले. यादरम्यान दोन्ही देशांत तंत्रज्ञान व माहिती क्षेत्रातील सहकार्य वाढले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबतच्या चर्चेमुळे अणुऊर्जा क्षेत्रातील तणावही कमी झाला.
जॉर्ज एच. डब्ल्यू. वॉकर बुश (1989-1993)
अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.वॉकर बुश यांनी भारताशी आदरयुक्त संबंध ठेवले, परंतु पाकिस्तानकडे त्यांच्या झुकत्या धोरणांमुळे भारतात नाराजी होती. बुश यांनी भारत-आणि पाकिस्तानमध्ये शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात दुहेरी कर टाळण्यावर भारत-अमेरिकेत करार करण्यात आला. यावेळी भारतामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती मात्र, त्यांनी भारतीय लोकशाहीवर पूर्ण विश्वास दाखवला होता.
बिल क्लिंटन (1993-2001)
क्लिंटन यांनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना अधिक चालना दिली, मात्र पोखरण अणुचाचणीनंतर भारतावर निर्बंध लादण्यात आले. नंतर 2000 मधील भारत भेटीने दोन्ही देशांतील संबंध मजबूत झाले.
जॉर्ज डब्ल्यू. बुश (2001-2009)
अमेरिकेचे 43 वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका परमाणु करार करण्यात आला. या करारामुळे भारताला अणुऊर्जा प्रकल्प चालवण्याची मुभा दिली. संरक्षण व सामरिक सहकार्य वाढले.
बराक ओबामा (2009-2017)
बराक ओबामा यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध अधिक उंचावले. त्यांनी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान देण्याचे समर्थन केले. त्यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिकेत धोरणात्मक संबंध दृढ झाले. बराक ओबामा यांनी भारताला प्रमुख संरक्षण भागीदाराचा दर्जा दिला आणि 14.9 अब्ज डॉलर्सचा व्यापार करार जाहीर केला.
डोनाल्ड ट्रम्प (2017-2021)
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळाची शपथ 20 जानेवारी 2017 रोजी घेतली. यावेळी ट्रम्प यांचा कार्यकाळ भारतासाठी काहीसा साकारात्मक आणि काहीसा नकारात्मक ठरला. व्यापारात तणाव वाढला, पण धोरमात्मक भागीदारी मजबूत झाली. हाउडी मोदी आणि नमस्ते ट्रम्प कार्यक्रम संबंधांचे महत्त्व अधोरेखित करतात.
जो बाइडेन (2021-2025)
अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका तंत्रज्ञान, संरक्षण व अणुऊर्जा क्षेत्रांत अधिक जवळ आले. भारताच्या तीन प्रमुख अणुसंस्थांवरील निर्बंध हटवणे हे त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे पाऊल ठरले. ही परंपरा पाहता, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध कोणत्या दिशेने जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.