मेक्सिको: उत्तर अमेरिकेतील मेक्सिको (Mexico) पुन्हा एकदा एका भयानक कृत्यामुळे हादरुन गेलं आहे. मेक्सिकोमध्ये काही बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले आहेत. मेक्सिकोमधील जेलिस्को या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून 7 बेपत्ता नागरिकांचा तपास पोलिसांकडून केला जातोय. याचदरम्यान गुरुवारी (1 जून) स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 अशा बॅग सापडल्या आहेत ज्यामध्ये मानवी शरीराचे तुकडे आहेत. या सर्व बॅग एका खड्ड्यात सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “या 45 बॅगमध्ये महिला आणि पुरुषांच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत.” पोलिसांना मंगळवारी जेलिस्कोमधील जापोपन या उपनगरातील नगर पालिकेच्या परिसरात एका खड्ड्यात शरीरराचे तुकडे असलेल्या बॅग्स मिळाल्या. जेलिस्को पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गेल्या एक आठवड्यापासून सात बेपत्ता लोकांचा तपास करत आहेत. यामध्ये 30 वर्षांच्या दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. हे सातही जण गेल्या महिन्याच्या 20 तारखेपासून बेपत्ता आहेत. तसेच या सर्व लोकांच्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र तपास करताना असं आढळून आलं की सगळी माणसं एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तसेच ज्या भागातून शरीराचे हे तुकडे सापडले त्याच भागात हे कॉल सेंटर असल्याचं देखील पोलिसांच्या लक्षात आलं.
दरम्यान फॉरेन्सिक तज्ञांनी मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आणि त्यांच्या ओळखीविषयी काहीही माहिती दिलेली नाही. पोलिसांना सुरुवातीच्या तपासात असं समजलं की, या कॉल सेंटरमध्ये काही अवैध कामं सुरु होती. तसेच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन पोलिसांना रक्ताचे डाग असलेले कपडे आणि इतर काही सामान सापडलं आहे. काही वर्षांपूर्वीदेखील पोलिसांनी जेलिस्कोच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. जेलिस्कोमधील टोनाल नगरपालिकेच्या परिसरात 2021 मध्ये अकरा माणसांच्या शरीराचे तुकडे 70 बॅगमध्ये मिळाले होते. याशिवाय 2019 मध्ये जपोपनमध्ये एका अज्ञातस्थळी 119 बॅगमध्ये 29 लोकांचे मृतदेह आढळून आले होते. आता या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांचं पुढचं पाऊल काय असणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.






