ऑस्ट्रेलिया 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री(फोटो-सोशल मीडिया)
AUS vs SL, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात टॉस गामावणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार मीचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेसमोर १८२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात श्रीलंकेने पाथुम निसांकाच्या नाबाद शतकाच्या जोरावर १८ षटकांत १८२ धावांचे लक्ष्य गाठले.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली केली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने ८.२ षटकांत १०० धावा केल्या. एक वेळ वाटत होते ऑस्ट्रेलिया २०० चा आकडा सहज पार करेल. परंतु २० षटकांत सर्वबाद १८१ धावांतच संघ गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने ५६ आणि मिचेल मार्शने ५४ धावा केल्या. तसेच, इंग्लिश आणि मॅक्सवेलने मधल्या फळीत भागीदारी करून संघाला १५० धावांच्या पुढे पोहचवले. इंग्लिश २७ धावांवर बाद झाला, तर मॅक्सवेल २२ धावांवर माघारी गेले. श्रीलंकेकडून दुशन हेमंथाने तीन आणि दुष्मंथा चामीराने दोन विकेट्स घेतल्या.
Sri Lanka ace the chase in style to book their place in Super 8 of #T20WorldCup 2026 🔥 📝: https://t.co/vAzvkwkRwo pic.twitter.com/pkXdOPvfyA — ICC (@ICC) February 16, 2026
ऑस्ट्रेलियाने दीलल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या श्रीलंकन संघाने आपल्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कुसल परेरा १ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी १०५ धावांची भागीदारी केली, कुसल ३८ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला, त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार मारला. कुसल बाद झाल्यावर पवन रथनायके मैदानावर आला, पवन रथनायकेला साथीला घेऊन पाथुम निसांकाने श्रीलंकेला विजय मिळवून दिला. पाथुम निसांका या विजयाचा खरा हीरो ठरला. त्याने ५२ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०० धावा केल्या. तर पवन रथनायकेने नाबाद २८ धावा केल्या. श्रीलंका संघाने या विजयासह सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाचे मात्र स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (डब्ल्यू), पवन रथनायके, दासुन शनाका (क), कामिंदू मेंडिस, दुशन हेमंथा, दुनिथ वेललागे, दुष्मंथा चमीरा, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, कूपर कोनोली, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा






