
Iran discovers 7.5 trillion cubic feet of gas Will US sanctions be ineffective
पश्चिम आशियातील युद्धाचे ढग आणि अमेरिकेच्या अत्यंत कठोर निर्बंधांच्या काळात इराणने आंतरराष्ट्रीय ऊर्जा क्षेत्रात एक मोठी आणि खळबळजनक घोषणा केली आहे. इराणच्या (iran) दक्षिणेकडील फार्स प्रांतात नैसर्गिक वायूचा एक अतिशय विशाल साठा सापडला आहे. इराणचे तेल मंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन वायू क्षेत्रात ७.५ ट्रिलियन घनफूट (अंदाजे २१२.४ अब्ज घनमीटर) पेक्षा जास्त नैसर्गिक वायूचा साठा उपलब्ध आहे. यापैकी सुमारे ५.७ ट्रिलियन घनफूट वायू प्रत्यक्ष उत्खनन करून वापरण्यायोग्य (Recoverable) स्थितीत आहे.
हा नवीन शोध अशा वेळी समोर आला आहे जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षांमुळे इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. इराणकडे आधीपासूनच अंदाजे ३४ ट्रिलियन घनमीटर नैसर्गिक वायूचे सिद्ध साठे आहेत, ज्यामुळे जागतिक स्तरावर रशियानंतर इराण दुसऱ्या क्रमांकावर येतो. तरीही, देशांतर्गत अतिरिक्त वापर, पायाभूत सुविधांवरील हल्ले आणि परदेशी गुंतवणुकीचा अभाव यांमुळे इराणमध्ये वारंवार ऊर्जा संकट आणि वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अशा स्थितीत हा नवा वायू साठा इराणच्या अर्थव्यवस्थेला आणि ऊर्जा पुरवठ्याला संजीवनी देणारा ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran Conflict: इराणवर अमेरिकेचा सर्वात मोठा ‘आर्थिक D-Day’ हल्ला; तेहरान गुडघे टेकायला पडेल का भाग?
कागदोपत्री हा शोध इराणसाठी अब्जावधी डॉलर्सची नवीन संपत्ती मानला जात असला, तरी प्रत्यक्ष जमिनीतून हा वायू बाहेर काढणे इराणसाठी सोपे नाही. या नवीन वायू क्षेत्रातून गॅस आणि ‘गॅस कंडेन्सेट’ (द्रवरूप हायड्रोकार्बन) मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांची अत्यंत गरज आहे. अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे जागतिक तेल व वायू कंपन्या इराणमध्ये गुंतवणूक करण्यास कचरतात. त्यामुळे या नवीन साठ्यांचे व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यासाठी आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारात पोहचवण्यासाठी इराणला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल.
विशेष म्हणजे, या नवीन साठ्यातील वायू हा ‘स्वीट गॅस’ (Sweet Gas) स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये हायड्रोजन सल्फाईडचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे वायू शुद्धीकरणाचा खर्च आणि वेळ दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाचणार असून, उत्खननाचा खर्चही कमी होणार आहे. इराणच्या तेल मंत्रालयानुसार, या एकाच क्षेत्रातील वायूचा साठा म्हणजे इराणच्या प्रसिद्ध ‘साऊथ पार्स’ गॅस क्षेत्रातील एका टप्प्याच्या १५ वर्षांच्या उत्पादनाइतका आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी ‘कमाल दबाव’ (Maximum Pressure) धोरण अवलंबले आहे. परंतु इराणला लागोपाठ सापडणारे ऊर्जेचे साठे ट्रम्प यांच्या या धोरणाला सुरुंग लावत आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये इराणने पाझान गॅस क्षेत्रात १० ट्रिलियन घनफूट गॅस आणि २०० दशलक्ष बॅरल कच्चे तेल शोधले होते. आता पुन्हा लागलेल्या ७.५ ट्रिलियन घनफूट साठ्यामुळे इराणला दीर्घकालीन ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lindsay Clancy Case: 3 मुलांची हत्या आणि मानसिक आजाराचा वाद; पाहा काय आहे पोस्टपार्टम सायकोसिस? ज्यामुळे अमेरिकेत खळबळ
याशिवाय, जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीवर’ (Strait of Hormuz) सध्या दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. जागतिक व्यापारातील २० टक्के तेल आणि एलएनजी याच मार्गावरून जाते. अमेरिकेच्या सागरी नाकेबंदी आणि युद्धाच्या धोक्याला न जुमानता इराणने मार्च ते जुलै २०२६ या कालावधीत तेल निर्यातीतून ७.५ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन महसूल मिळवला आहे. हा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे इराणचा वाढता ऊर्जा खजिना आणि तेल विक्रीतून मिळणारा पैसा ट्रम्प प्रशासनाची डोकेदुखी नक्कीच वाढवणारा ठरेल.