
फोटो सौजन्य AI
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत असताना इराणने इस्रायल आणि अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींवर इराणकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या हालचालींमधून इराणवर हल्ला करण्याचे संकेत मिळाल्यास कोणताही विलंब न करता जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इराणच्या लष्करी नेतृत्वाकडून देण्यात आला आहे.
Italy News : इटलीत महागाईविरोधात जनक्षोभ ; ४० हून अधिक शहरांत हजारोंचे आंदोलन
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर सैन्याला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या संभाव्य कारवायांवर लक्ष ठेवण्याबरोबरच देशाची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. लष्करी सज्जता कायम ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
इराणने स्पष्ट केले आहे की, अमेरिका किंवा इस्रायलकडून पुन्हा लष्करी अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले जाईल. या प्रत्युत्तराला भौगोलिक मर्यादा राहणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. इराणच्या लष्करी नेतृत्वाला संभाव्य लक्ष्यांची यादी अद्ययावत ठेवण्याचे आणि संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांच्या चर्चेमुळे मध्यपूर्वेतील वातावरण पुन्हा तापले आहे. दुसरीकडे, कतारच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिकेदरम्यान राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, दोन्ही बाजूंमधील अविश्वास आणि कठोर भूमिका यामुळे चर्चेवर अनिश्चिततेचे सावट आहे. इराणने आपल्या भूमिकेत कोणतीही माघार घेण्यास नकार दिल्याने आगामी काळात या प्रदेशातील परिस्थिती अधिक संवेदनशील होण्याची शक्यता आहे.