फोटो सौजन्य सोशल मीडिया
युद्धामुळे आत्तापर्यंत १ लाख २० हजारांहून जास्तच डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज युक्रेनमधील संशोधकांनी व्यक्त केला आहे . यामुळे काळ्या समुद्रातील नैसर्गिक परिसंस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे . याची किंमत खूप मोठी असून येणाऱ्या काळात ती माणसाला चुकवावी लागणार आहे .
रशियन सैन्याकडून वापरण्यात येणारी शक्तिशाली सोनार यंत्रणा ,क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण आणि समुद्राखाली होणारे स्फोट डॉल्फिनसाठी घातक ठरत आहेत . डॉल्फिन हे दिशेचा अंदाज घेण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी प्रतिध्वनीवर आधारित यंत्रणेचा वापर करतात .
मात्र युद्धातील मोठ्या आवाजामुळे त्यांच्या या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम होत आहे . त्यांना दिशा ओळखणे , एकमेकांशी संपर्क साधने आणि अन्न शोधणे कठीण होत आहे . काही डॉल्फिन समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळत असून अनेकांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी जात असल्याने प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या मोजनेही कठीण आहे .
युद्ध सुरु असताना अनेक युद्धनौका , तेलवाहुन ,मालवाहतूक करणारी जहाजे यांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे समुद्रात तेल , इंधन आणि इतर रासायनिक पदार्थांची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि होत सुद्धा आहे . या प्रदूषणाचा परिणाम समुद्रातील मासे , शिंपले आणि इतर बऱ्याच जलचरांवर होत आहे .
यामुळे खूपच मौल्यवान अशी अन्नसाखळी विस्कळीत झाल्याने संपूर्ण सागरी परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे . समुद्रकिनाऱ्यावरील पक्षांनाही युद्धातील ड्रोन आणि स्फोटांच्या आवाजाचा फटका बसत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे .
युक्रेनमधील तुझली लगून्स राष्ट्रीय उद्यानाचे संशोधनप्रमुख इव्हान रुसेव्ह यांच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर डॉल्फिनच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. २०२६ पर्यंत मृत्यूंचा अंदाज १ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. काळ्या समुद्रातील एकूण सागरी सस्तन प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत हा मोठा धक्का असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
युद्ध संपल्यानंतरही या जीवसृष्टीला पूर्वपदावर येण्यासाठी ३० ते ५० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा पर्यावरणावर उमटणारा परिणाम कित्येक दशकांपर्यंत कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे . यामुळे नैसर्गिक संपत्ती सुद्धा या युद्धामुळे पणाला लागली आहे .






