
iran sunni cleric mohammad anwar rigi killed mosque shooting mirjaveh sistan baluchestan tension
इराणच्या (Iran) सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या मिर्जावेह (Mirjaveh) शहरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सुन्नी समाजाचे प्रमुख स्थानिक नेते आणि धर्मगुरू मौलवी मोहम्मद अन्वर रिगी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. रिगी हे शहरातील ‘अली इब्न अबी तालिब’ मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाचे मुख्य इमाम (इमाम-ए-जुम्मा) म्हणून कार्यरत होते. रॉयटर्सने इराणच्या सरकारी माध्यमांचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार पहाटे ४ च्या सुमारास घडली, जेव्हा रिगी हे मशिदीच्या परिसरात होते. या घटनेमुळे संपूर्ण सीमावर्ती भागात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.
मौलवी मोहम्मद अन्वर रिगी यांच्यावर झालेला हा काही पहिला हल्ला नव्हता. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्येही त्यांच्यावर अशाच प्रकारे भीषण गोळीबार करण्यात आला होता, परंतु त्या प्राणघातक हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. मात्र, रविवारी पहाटे हल्लेखोरांनी अत्यंत पूर्वनियोजित कट रचून त्यांना मशिदीजवळ गाठले आणि त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या रिगी यांचा जागीच मृत्यू झाला. या दुसऱ्या आणि यशस्वी ठरलेल्या हल्ल्यामुळे इराणमधील अल्पसंख्याक सुन्नी समुदायाची सुरक्षा आणि सिस्तान-बलुचिस्तानमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
या हत्येच्या पाठीमागे केवळ दहशतवादी कट नाही, तर स्थानिक पातळीवरील तीव्र राजकीय आणि धार्मिक मतभेद असल्याचेही समोर येत आहे. मिर्जावेह मशिदीत ‘इमाम-ए-जुम्मा’ म्हणून मोहम्मद अन्वर रिगी यांची झालेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. हे पद आधी मौलवी अब्दुल कहर मिर्बलुचझाही यांच्याकडे होते. मात्र, इराणच्या सुरक्षा दलांनी मिर्बलुचझाही यांना अटक केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर रिगी यांना या पदावर बसवण्यात आले, ज्याला स्थानिक सुन्नी बलुच नागरिकांच्या एका मोठ्या गटाने तीव्र विरोध दर्शवला होता. या अंतर्गत वादामुळेच त्यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
🇮🇷 An Iranian Sunni cleric has been killed by “unknown gunmen” in the country’s southeast. Iran is predominantly a Shia Muslim country, with approximately 90% of its population adhering to that branch of Islam. However, Iran also has a significant Sunni minority, roughly 8-10%… pic.twitter.com/lIRQPZFIay — Mario Nawfal (@MarioNawfal) July 20, 2026
credit – social media and Twitter
सिस्तान-बलुचिस्तान हा प्रांत भौगोलिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून इराणमधील सर्वात गरीब, संवेदनशील आणि अशांत भाग मानला जातो. शियाबहुल देश असलेल्या इराणमध्ये, या विशिष्ट प्रांतात सुन्नी बलुच लोकांची लोकसंख्या अधिक आहे. येथे वांशिक भेदभाव, गरिबी आणि अंमली पदार्थांची तस्करी यांमुळे सुरक्षा दल आणि स्थानिक अतिरेकी गटांमध्ये (जसे की जैश अल-अद्ल) अनेक दशकांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने या हत्येचा तीव्र निषेध केला असून, हा प्रांतातील जातीय सलोखा बिघडवण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Attacks US : जॉर्डनच्या सैन्यानेच केला अमेरिकेचा गेम? इराणच्या 20 तळांवरील भीषण हल्ल्याने वॉशिंग्टन हादरले; 2 सैनिक ठार
या हत्येनंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण मिर्जावेह शहरात नाकेबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळ ही घटना घडल्याने याला आंतरराष्ट्रीय सामरिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. स्थानिक प्रशासनाने जनतेला शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, सुन्नी धर्मगुरूच्या या हत्येमुळे प्रांतातील शिया आणि सुन्नी समुदायांमध्ये पुन्हा एकदा अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात येथील सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवणे इराण सरकारसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.