Mojtaba Khamenei : हवाई हल्ल्यात जखमी, रुग्णालयाचा विध्वंस अन् सुटका; अमेरिकन हल्ल्यातून कसे वाचले मोजतबा खामेनी? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावाच्या आणि युद्धाच्या भयंकर सावटादरम्यान इराणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei ) हे अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. तेहरानमधील एका मोठ्या रुग्णालयावर अमेरिका आणि इस्रायली दलांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात इमारतीचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता आणि मोजतबा खामेनी हे त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. इराणच्या शक्तिशाली ‘तज्ज्ञ परिषदेचे’ (Assembly of Experts) सदस्य मोहसेन हैदरी यांनी ‘अल अरबी टीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा अत्यंत संवेदनशील खुलासा केला आहे.
मोहसेन हैदरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण नाट्यमय घडामोडींची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुरुवातीच्या हवाई हल्ल्यांपासून झाली. त्या काळात झालेल्या हल्ल्यांमध्ये मोजतबा खामेनी हे जखमी झाले होते, ज्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी तेहरानमधील एका प्रमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शत्रूच्या गुप्तचर यंत्रणांनी त्या ठिकाणाचा माग काढत तेहरानमधील लागोपाठ तीन मोठ्या रुग्णालयांना लक्ष्य करत बॉम्बहल्ला केला. ज्या तिसऱ्या रुग्णालयावर हल्ला झाला, त्याच इमारतीत मोजतबा यांच्यावर उपचार सुरू होते. भीषण स्फोटांमुळे रुग्णालयाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली, परंतु सुदैवाने वेळेवर पोहोचलेल्या आपत्कालीन यंत्रणांनी मोजतबा यांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले.
या प्राणघातक हल्ल्याच्या आणि भीषण युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया अत्यंत गुप्त आणि आव्हानात्मक पद्धतीने पार पडली. हैदरी यांनी या ऐतिहासिक निवड प्रक्रियेचा सविस्तर पट मांडताना सांगितले की, कोम शहरातील तज्ज्ञ परिषदेच्या मुख्य कार्यालयावरही शत्रूकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परिषदेच्या ८ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सर्वोच्च नेत्याच्या निवडणुकीशी संबंधित महत्त्वाची अधिकृत कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली. या भीषण संकटाच्या काळातही उर्वरित सदस्यांनी खचून न जाता एका गुप्त ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
सचिवालय उद्ध्वस्त झाल्यामुळे आणि मतपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे सर्व सदस्यांनी कागदाच्या लहान चिठ्ठ्यांवर आपली मते नोंदवून ऐतिहासिक मतदान पार पाडले. तज्ज्ञ परिषदेच्या एकूण ५९ सदस्यांपैकी तब्बल ५० सदस्यांनी मोजतबा खामेनी यांच्या बाजूने कौल दिला. तर दुसरीकडे, प्रतिस्पर्धी उमेदवार आयातुल्ला अलीरेझा अराफी यांना केवळ ८ मते मिळाली आणि एका सदस्याने मतदानात भाग घेणे टाळले. सुरक्षेच्या सुरक्षेच्या अत्यंत कडक कारणास्तव या निवडीची अधिकृत घोषणा तात्काळ राष्ट्रीय दूरदर्शनवरून करण्यात आली नव्हती. ५६ वर्षीय मोजतबा हे औपचारिक प्रशासकीय पदावर नसले, तरी त्यांनी दीर्घकाळ आपले वडील अयातुल्ला अली खामेनी यांचे मुख्य सल्लागार म्हणून पडद्यामागून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
दरम्यान, मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत आणि शारीरिक स्थितीबाबत जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या शंका आणि अटकळ बांधल्या जात आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाचा हवाला देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, या हल्ल्यात मोजतबा गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्या शरीराचा डावा भाग, विशेषतः हात आणि पाय जबर दुखापतग्रस्त झाले आहेत. मात्र, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पेझेश्कियन यांनी स्पष्ट केले की, मोजतबा खामेनी पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त असून त्यांनी नुकतीच देशाच्या धोरणात्मक निर्णयांवर सुमारे सात तास प्रदीर्घ बैठक घेतली आहे. सध्या इराणचे सर्वोच्च नेते म्हणून ते सर्व महत्त्वाचे प्रशासकीय व लष्करी निर्णय अत्यंत सक्षमपणे घेत आहेत.






