North Korea POW Row: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या 'त्या' वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि मुत्सद्देगिरीमध्ये सध्या एक नवी खळबळ उडाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात रशियन सैन्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या दोन उत्तर कोरियन सैनिकांना युक्रेनियन सैन्याने जिवंत पकडले होते. पुढे या दोन युद्धकैद्यांना दक्षिण कोरियाकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची माहिती गुप्त ठेवण्याचा दोन्ही देशांमध्ये ‘गोपनीयता करार’ (North Korea POW Row) झाला असताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत याचा जाहीर खुलासा केला. युक्रेनच्या या एकतर्फी कारवाईवर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती कार्यालय अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी याला कराराचे थेट उल्लंघन ठरवले आहे आणि युक्रेनकडे अधिकृत स्पष्टीकरण व माफीची मागणी केली आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती कार्यालयातील जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ सचिव सेओंग घी-होंग यांनी रविवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “युक्रेनने परस्पर सहमतीने ठरलेला गोपनीयता करार मोडून एकतर्फी माहिती जाहीर केली आणि त्यानंतर असा कोणताही करार अस्तित्वात नव्हता अशी खोटी भूमिका घेतली, याबद्दल आमच्या कार्यालयाला तीव्र खेद वाटतो.” दक्षिण कोरियाने या संपूर्ण प्रकाराला राजनैतिक विश्वासाचा घात मानले असून, गरज भासल्यास पुढील काळात कडक पावले उचलण्याचा इशाराही दिला आहे.
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे-म्युंग आणि त्यांच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या सैनिकांचे हस्तांतरण गुप्त ठेवण्यामागे आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवतावादी दृष्टिकोन होता. दक्षिण कोरियाने दावा केला आहे की, युक्रेन सरकारनेच सुरुवातीला या प्रकरणाची गोपनीयता राखण्याची मागणी केली होती. याचे कारण असे होते की, युक्रेनमध्येच यावर अंतर्गत टीका होऊ शकली असती की, युक्रेनियन सैनिकांच्या बदल्यात या उत्तर कोरियन युद्धकैद्यांची अदलाबदल करण्याची संधी युक्रेनने गमावली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Rooppur Nuclear Plant: बांगलादेशच्या प्रगतीवर पाकिस्तानचा जळफळाट; रशियन युरेनियम विमान रोखले, ढाकावर ओढवणार विजेचे संकट
याशिवाय, हे युद्धकैदी आणि उत्तर कोरियात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ नये, हा मुख्य उद्देश या गोपनीयतेमागे होता. तरीही युक्रेनियन माध्यमांतून असा करार अस्तित्वातच नव्हता असा प्रचार केला जात असल्याने, दक्षिण कोरियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संवेदनशील सुरक्षा आणि राजनैतिक मुद्द्यांचे राजकारण केले जात असल्याचा थेट आरोप सेओंग यांनी युक्रेनवर केला आहे.
२३ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या सत्रात बोलताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हस्तांतरणाचा जाहीर उल्लेख केला. झेलेन्स्की म्हणाले, “आम्ही नुकतेच दोन उत्तर कोरियन युद्धकैद्यांना दक्षिण कोरियात पाठवले आहे. या लोकांना जिवंत पकडणे मुळीच सोपे नव्हते. जेव्हा एका सैनिकाला आपण पकडले जाणार याची जाणीव झाली, तेव्हा त्याने थेट आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नशिबाने त्याला वाचवले.” उत्तर कोरियातील नागरिकांवर आणि सैनिकांवर बालपणापासून कशा प्रकारचे टोकाचे ब्रेनवॉशिंग केले जाते, हे दाखवण्यासाठी झेलेन्स्की यांनी या घटनेचा दाखला दिला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, २०२५ च्या सुरुवातीला रशियाच्या कुर्स्क प्रदेशात युद्ध चालू असताना युक्रेनच्या सैन्याने या उत्तर कोरियन सैनिकांना ताब्यात घेतले होते. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी रशियन सैन्यातील कमकुवत भाग मजबूत करण्यासाठी आणि रशियाला पाठिंबा देण्यासाठी हजारो सैनिकांना तिथे तैनात केले होते. या युद्धादरम्यान उत्तर कोरियन सैनिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत, किम जोंग उन आपल्या सैनिकांचा वापर क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात ‘चलन’ (Currency) सारखा करत असल्याचा घणाघाती आरोपही झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात केला.






