केनियामध्ये आणखी एका हेलिकॉप्टर अपघातात गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू झाला असून, ५ अमेरिकन नागरिकही ठार झाले आहेत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पूर्व आफ्रिकेतील (african country) केनिया देशात एका भीषण हेलिकॉप्टर अपघातामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. राजधानी नैरोबीच्या उत्तरेस असलेल्या सांबुरू काउंटीमधील प्रसिद्ध ‘ओलोलोकवे’ पर्वताच्या (Mount Ololokwe) पायथ्याशी एक पर्यटक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्दैवी दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लॅटिन अमेरिकन देश इक्वेडोरचे गुप्तचर प्रमुख मिशेल सेन्सी-कॉन्टुगी (Michele Sensi-Contugi), त्यांची पत्नी आणि पाच अमेरिकन नागरिकांचा समावेश असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे युरोकॉप्टर EC130 B4 बनावटीचे हेलिकॉप्टर ‘लोइसाबा वन्यजीव अभयारण्यातून’ (Loisaba Conservancy) उड्डाण करून प्रवाशांना हवाई सफर घडवत होते. सकाळी सुमारे ९:१३ वाजता ओलोलोकवे पर्वताजवळ अचानक हेलिकॉप्टरचा नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळले. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० मीटर उंचीवर असून अत्यंत दुर्गम आणि खडकाळ भाग असल्याने बचाव पथकांना पोहोचण्यात सुरुवातीला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
या अपघातात मृत्यू झालेले ४२ वर्षीय मिशेल सेन्सी-कॉन्टुगी हे इक्वेडोरच्या राष्ट्रीय गुप्तचर केंद्राचे (CINI) महासंचालक होते. इक्वेडोरचे उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात असत. नोबोआ यांनी ड्रग्ज कार्टेल्स आणि संघटित गुन्हेगारीविरोधात उभारलेल्या आक्रमक लढ्यात मिशेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इक्वेडोरचे परिवहन मंत्री रॉबर्टो लुके यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा देत मिशेल आणि त्यांच्या पत्नी स्टेफनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मिशेल आपल्या पत्नीसोबत केनियात पर्यटनासाठी गेले होते.
दुसरीकडे, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (US State Department) देखील आपल्या ५ नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यामध्ये अमेरिकेतील प्रमुख स्पॅनिश-भाषी टीव्ही नेटवर्क ‘टेलिमुंडो’चे (Telemundo) फ्लोरिडा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक जोस अल्बर्टो सुआरेझ (José Alberto Suárez) यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एनबीसीयुनिव्हर्सल (NBCUniversal) आणि टेलिमुंडोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जोस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे (KCAA) संचालक आणि ‘विमान अपघात तपास विभागा’चे (AAID) प्रमुख फ्रेडरिक काबुंगे यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल की अन्य काही कारणामुळे हा अपघात झाला, याचा शोध घेतला जात आहे. अपघातस्थळाचे कठीण भौगोलिक स्थान, दाट अंधार आणि लागलेली आग यामुळे केनिया रेड क्रॉस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला बचाव व मदतकार्यात मोठा संघर्ष करावा लागला.
केनियामध्ये पर्यटनासाठी हेलिकॉप्टर हवाई सफारी अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत केनियात झालेल्या या सलग हेलिकॉप्टर दुर्घटनांमुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये देखील पश्चिम केनियामध्ये झालेल्या अशाच एका हेलिकॉप्टर अपघातात एका खासदारासह ६ जणांचा जीव गेला होता. सध्या केनिया सरकार, एफबीआय आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा या दुर्दैवी दुर्घटनेचा सखोल तपास करत आहेत.






