Bangladesh measles outbreak : बांगलादेशात गोवरचा हाहाकार! आठ महिन्यांत 1,147 मृत्यू; लसीकरणातील दुर्लक्षाचा बालकांना फटका, सौजन्य : आयएएनएस
बांगलादेशात गोवरच्या उद्रेकाने (Bangladesh measles outbreak)गंभीर स्वरूप धारण केले असून, गेल्या आठ महिन्यांत या आजारामुळे 1,147 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण तब्बल 94 टक्के आहे. नियमित लसीकरणातील घट, अपुरी आरोग्यसेवा आणि मुलांच्या नोंदणीतील त्रुटी यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे समोर आले आहे.
जपानमधील एका वर्तमानपत्रातील बातमीनुसार, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीतून बांगलादेशातील गोवरच्या उद्रेकाची तीव्रता स्पष्ट झाली आहे. मार्चच्या मध्यापासून आतापर्यंत देशात गोवरचे दोन लाख दोन हजारांहून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 22 हजार रुग्णांना प्रयोगशाळेतील तपासणीतून गोवरची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
गोवरचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण किमान 95 टक्के असणे आवश्यक असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. मात्र, WHO आणि UNICEF यांच्या अंदाजानुसार, 2025 मध्ये बांगलादेशात गोवराच्या लसीच्या पहिल्या मात्रेचे लसीकरण 90 टक्क्यांपर्यंत, तर दुसऱ्या मात्रेचे प्रमाण 86 टक्क्यांपर्यंत घसरले. त्यामुळे संसर्गाचा प्रसार रोखण्यातील आव्हाने वाढली आहेत.
Indian Army : ये नया Bharat हैं! लढाऊ विमाने असोत वा सूक्ष्म ड्रोन; ‘ही’ ठरणार भारताची ताकद
बांगलादेशातील लसीकरण मोहिमेत आकडेवारीतील त्रुटी आणि आरोग्यसेवेच्या मर्यादा महत्त्वाच्या अडचणी ठरल्या आहेत. UNICEF आणि बांगलादेश सांख्यिकी ब्युरोच्या माहितीनुसार, सुमारे 40 टक्के बालकांची नोंदणीच झालेली नव्हती. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांची ओळख पटवणे आणि त्यांच्यापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे कठीण झाले.
सरकारी आकडेवारीनुसार, देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांची जवळपास एकतृतीयांश पदे रिक्त आहेत. परिणामी, दुर्गम भागांतील मुलांपर्यंत लसीकरण आणि उपचारसेवा पोहोचवण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण निर्धारित उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदवले गेल्याने आकडेवारीच्या अचूकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या संकटाची गंभीरता दाखवणारी घटना ईशान्य बांगलादेशातील सिलहट भागात घडली. दोन वर्षांच्या अरमान हुसैनला गोवरची लस मिळाली नव्हती. त्याच्या उपचारांसाठी कुटुंबाने तीनचाकी ऑटो-रिक्षा विकली; मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्याचा मृत्यू झाला. आरोग्य कर्मचारी आपल्या दुर्गम गावापर्यंत पोहोचू शकले नसल्याचे अरमानच्या वडिलांनी सांगितले.
सप्टेंबरमध्ये बांगलादेशात दररोज सरासरी 1,198 नवीन संशयित रुग्णांची नोंद झाली. मे महिन्यानंतरची ही सर्वाधिक सरासरी होती. त्यामुळे गोवराचा प्रसार रोखण्यासाठी अधिक व्यापक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
आरोग्यतज्ज्ञांनी पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांचाही लसीकरण मोहिमेत समावेश करण्याचे आवाहन केले आहे. गोवराच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे एकतृतीयांश रुग्ण या वयोगटातील असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
लसीकरणातील उणिवा दूर करणे, अचूक आकडेवारी तयार करणे आणि दुर्गम भागांतील मुलांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे या उपायांवर बांगलादेशातील गोवर नियंत्रणाचे यश अवलंबून राहणार आहे.
Ans: मार्चच्या मध्यापासून आठ महिन्यांत गोवराच्या उद्रेकादरम्यान 1,147 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्तात नमूद आहे.
Ans: मृतांपैकी 94 टक्के बालके पाच वर्षांखालील असल्याचे WHO च्या आकडेवारीचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे.
Ans: नियमित लसीकरणातील घट, अपुरी आरोग्यसेवा, मुलांच्या नोंदणीतील त्रुटी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ही प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद आहे.






