दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसाचे औचित्य; अमेरिकेने पाठवला 'असा' संदेश की ऐकून चीन नाराज ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Dalai Lama 90th birthday : तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू १४वे दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस साजरा होत असताना, अमेरिकेने त्यांच्या सन्मानार्थ दिलेला स्पष्ट संदेश चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तिबेटी लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याचे समर्थन करत दिलेल्या निवेदनामुळे चीनमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे.
दलाई लामा हे “आवाज नसलेल्यांचा आवाज” म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या एका महत्त्वपूर्ण घोषणेत स्पष्ट केले की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी असेल, ज्यामुळे त्यांच्या ६०० वर्षांपासून सुरू असलेल्या संस्थेच्या भविष्यासंदर्भातील अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दलाई लामांना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “तिबेटी लोकांच्या मानवी हक्कांचा आणि मूलभूत स्वातंत्र्याचा आदर करण्यास अमेरिका वचनबद्ध आहे.”
या निवेदनात तिबेटी भाषेचे, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे संरक्षण करण्यासाठीचे प्रयत्न, तसेच “धार्मिक नेत्यांची स्वायत्त निवड करण्याचा अधिकार” यावर भर देण्यात आला आहे. हा संदेश चीनसाठी अप्रत्यक्ष टोला मानला जात असून, तिबेटमध्ये चीनच्या हस्तक्षेपाविरोधात अमेरिका उघडपणे उभी असल्याचे दाखवतो.
US govt wishes Dalai Lama ahead of his birthday.
Says, ‘we support efforts to preserve Tibetans’ distinct linguistic, cultural, & religious heritage, including their ability to freely choose and venerate religious leaders without interference’
Last line a message to 🇨🇳 pic.twitter.com/rwca0hXQ3n
— Sidhant Sibal (@sidhant) July 5, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीवर आढळला थेट मंगळ ग्रहावरचा दगड; लवकरच होणार लिलाव पण शास्त्रज्ञांनी व्यक्त केली नाराजी, पाहा का ते?
केंद्रीय तिबेटी प्रशासन (CTA) ने दलाई लामांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ६ जुलै २०२५ ते ५ जुलै २०२६ या कालावधीत ‘करुणेचे वर्ष’ म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे. हिमालयातील भारताच्या उत्तर भागातील धर्मशाळा येथे ही घोषणा करण्यात आली. CTA जगभरातील तिबेटी लोकांचे राजकीय व सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. करुणा आणि अहिंसेच्या मूल्यांना व्यापक पातळीवर पोहोचवण्याचा उद्देश या वर्षामागे आहे.
दलाई लामा यांनी त्यांच्या संदेशात सांगितले की, “मी मानवी मूल्यांना, धार्मिक एकतेला, आणि प्राचीन भारतीय ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत राहीन. तिबेटी संस्कृती ही जगाला करुणा आणि शांततेचा संदेश देणारी आहे.” ते पुढे म्हणाले की, “बुद्ध आणि शांतीदेव यांसारख्या भारतीय गुरूंनी माझ्या जीवनावर खोल परिणाम केला आहे. त्यांच्या शिकवणींवर आधार घेत मी कठीण काळातही आत्मविश्वासाने पुढे जात आहे.”
१९५९ मध्ये तिबेटमध्ये चिनी सत्तेविरोधात झालेल्या उठावानंतर दलाई लामा भारतात निर्वासित झाले. त्यांनी कधीच पूर्ण स्वतंत्रतेची मागणी केली नाही, मात्र तिबेटला अधिक स्वायत्तता मिळावी यासाठी ते ‘मध्यम मार्ग’ धोरणाचे समर्थन करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-इराण संघर्षानंतर सर्वोच्च नेते खामेनेई यांची पहिलीच सार्वजनिक प्रतिक्रिया; बंकरमधून बाहेर येऊन दिला राष्ट्रवादी संकेत
दलाई लामांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेने दिलेला संदेश हा चीनसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे. यामुळे तिबेटी प्रश्नावर आंतरराष्ट्रीय राजकारण पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. दलाई लामांचा संयम, करुणा आणि शांततेच्या मार्गावरचा दृढ विश्वास आजही जागतिक पातळीवर प्रेरणादायी ठरत आहे.