'ऑपरेशन मुस्कान' ठरतंय प्रभावी; हरवलेल्या 286 पैकी 121 बालकांचा लागला शोध (फोटो सौजन्य-ट्विटर)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून 2018 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 286 बालके हरवली. त्यातील 121 बालके शोधण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत राबवलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात आले. यामध्ये बेपत्ता झालेल्या 72 बालकांपैकी 50 बालकांना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राज्यात २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत १८ वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान-१४ ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना याकामी विशेष सूचना दिल्या. या मोहिमेच्या अनुषंगाने सन २०१८ ते २० जानेवारी २०२६ या प्रलंबित कालावधीतील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, एकूण २१४ बालके (३० मुले आणि १८४ मुली) हरवल्याची नोंद होती.
हेदेखील वाचा : पुणे जिल्हा परिषद काँग्रेसमुक्त; पराभवानंतर संघटना बांधणीसाठी तालुकास्तरीय दौरे सुरू
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष प्रयत्न करून यातील ७१ बालकांचा (११ मुले आणि ६० मुली) शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. तसेच, मोहिमेच्या प्रत्यक्ष कालावधीत म्हणजे २० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान हरवलेल्या ७२ बालकांपैकी (२२ मुले आणि ५० मुली) ५० बालकांचा (१६ मुले आणि ३४ मुली) तातडीने शोध घेण्यात आला.
बालकांचा शोध घेऊन पालकांकडे केले सुपूर्द
ऑपरेशन मुस्कान-१४ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण १२१ बालकांचा (२७ मुले आणि ९४ मुली) यशस्वीरित्या शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
हेदेखील वाचा : Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात
वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता
राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिल्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही अधिक आहे. २०२५ आणि २०२४ मध्ये अनुक्रमे १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरविलेल्या एकूण महिल्यांपैकी २०२४ ला ३० हजार ८७७ आणि २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत.






