
Pakistan and Taliban forces clash along the Durand Line forcing Afghanistan to evacuate
इस्लामाबाद – पाकिस्तान आणि तालिबानी सैन्यामध्ये सुरू असलेली चकमक अधिक तीव्र होत असून ड्युरंड रेषेवरील संघर्ष धोकादायक वळण घेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीमाभागात सतत गोळीबार सुरू असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानने आपल्या सीमावर्ती भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
सीमेवर सुरूच आहे गोळीबार
पाकिस्तानच्या मोहमंद जिल्ह्यातील बायझाई आणि अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील दोरबाबा व गोश्ता जिल्ह्यांमध्ये गोळीबाराची तीव्रता वाढली आहे. स्थानिक सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी तोफगोळ्यांचा आणि स्वयंचलित शस्त्रांचा वापर केला जात आहे. या भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले असून, अफगाणिस्तानातील डझनभर कुटुंबांनी घरे सोडून सुरक्षित भागांमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे.
“खोरासान डायरी”ने केलेल्या ट्विटनुसार, पाकिस्तानी बाजूने अफगाण सीमा सैन्याच्या गोळीबारात किमान दोन जवान ठार झाल्याची माहिती आहे. मात्र, संघर्ष अद्यापही सुरूच असल्याने अधिकृत मृतांच्या संख्येची पुष्टी झालेली नाही.
तालिबान-पाकिस्तान संघर्षाचे कारण काय?
ड्युरंड रेषा ही ब्रिटिश काळात आखलेली पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमा आहे, परंतु तालिबान हा सीमारेषा मान्य करत नाही. अफगाण तालिबान पाकिस्तानला शत्रू मानत नाही, मात्र तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेला त्यांचा आश्रय असल्याचे पाकिस्तानचे आरोप आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हेच जगाच्या विनाशाचे संकेत? समुद्रातून वेदनेने तडफडत बाहेर आली दुर्मिळ डूम्सडे फिश, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, टीटीपीचे दहशतवादी अफगाण सीमाभागातून पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून दहशतवादी हल्ले घडवतात. पाकिस्तानच्या लष्कराने अलीकडेच दक्षिण वझिरीस्तानमध्ये गुप्तचर माहितीच्या आधारे मोठी मोहीम राबवून किमान ३० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी टीटीपीशी संबंधित असल्याचे पाकिस्तान लष्कराने स्पष्ट केले आहे.
तालिबानचा पाकिस्तानवर पलटवार
तालिबानने पाकिस्तानच्या आरोपांना स्पष्ट नकार दिला असून, अफगाण भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येत असल्याचा कोणताही पुरावा पाकिस्तानकडे नाही, असे म्हटले आहे. याआधी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हवाई हल्ले करून टीटीपीच्या अड्ड्यांवर कारवाई केली होती. मात्र, तालिबानने या हल्ल्यांमध्ये निरपराध नागरिक, महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
सीमाभागातील तणावामुळे नागरिकांचे हाल
खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रांत गेल्या काही महिन्यांपासून सतत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत आहेत. तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानमधील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानी सैन्य यांच्यातील संघर्षामुळे सीमाभागातील नागरिकांवर मोठे संकट आले आहे. गोळीबाराच्या भीतीने अनेकांनी घरे सोडून पलायन केले आहे, तर अनेक गावांमध्ये अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
आंतरराष्ट्रीय पातळीवर संघर्षाकडे लक्ष
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील वाढता तणाव दक्षिण आशियातील स्थैर्यासाठी मोठा धोका ठरत आहे. पाकिस्तान सातत्याने तालिबानला टीटीपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे, तर तालिबान पाकिस्तानच्या आंतरिक सुरक्षाविषयक धोरणांवर नाराजी व्यक्त करत आहे. या संघर्षाने पुढील काही दिवसांत आणखी मोठे रूप धारण केल्यास, संपूर्ण आशियाई प्रदेशावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.