इस्लामाबाद – कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला पाकिस्तान आता पूर्णपणे कंगाल झालेल्या स्थितीत (Pakistan Economic Crisis) पोहचलेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्याइतपतही पाकिस्तानकडे परदेशी मुद्रा भंडार (Foreign Currency ) राहिलेले नाही. देशात महागाईनं (Inflation) कहर केला असून, लोकं दोन वेळच्या अन्नासाठी शोधाशोध करीत असल्याचं दिसतंय. अशा अत्यंत बिकट स्थितीत पाकिस्तान सरकारनं आता अल्लाच्या भरवशावर असल्याचं स्पष्ट केलंय. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार (pakistan finance minister ishaq dar) म्हणाले आहेत की, इस्लामच्या नावावर निर्मिती झालेला पाकिस्तान हा एकमेव देश आहे. आता त्याच्या विकास आणि समृद्धीसाठी अल्लाच जबाबदार आहे.
एकीकडे देशावर मोठं आर्थिक संकट आलेलं असतानाही पाकिस्तानी सरकारला त्याचं फारसं सोयर सुतक नसल्याचंही समोर आलंय. या सगळ्या बिकट स्थितीत इस्लामाबादेत ग्रीन लाईम एक्सप्रेस रेल्वेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. त्यावर सरकारी खर्चाची उधळपट्टी करण्यात आली. या समारंभात अर्थमंत्री डार यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, इस्लामच्या नावानं या देशाची निर्मिती झाली आहे, त्यामुळं पाकिस्तान नक्कीच प्रगती करेल. जर अल्लानं पाकिस्तानची निर्मिती केली आहे, तर त्याचं संरक्षण आणि विकासही अल्लाच करेल. पुन्हा पाकिस्तान समृद्ध होईल.
इशाक डार पुढं म्हणाले की, सध्या अस्तित्वात असलेल्या शहबाज सरकारला, आधीच्या इम्रान खान सरकारकडून अनेक समस्या वारशाच्या रुपानं मिळाल्यात. सरकार यावर दिवस-रात्र काम करीत आहे. शहबाज यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पाकिस्तानची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
पाकिस्तानातील जनता मात्र सध्या अत्यंत संतापलेल्या अवस्थेत आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळवणं खूप अवघड होतं आहे. कांदा, पीठ यासारख्या वस्तूंचे भाव गगनाला पोहचलेले आहेत. देशातील बेरोजगारांची संख्या 50 लाखांपर्यंत गेलेली आहे. अशा स्थितीत श्रीलंकेची पुनरावृत्ती पाकिस्तानात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. जनता रस्त्यावर उतरली तर ते पाकिस्तान सरकारला महागात पडणार आहे.