India In UNGA : संयुक्त राष्ट्रात रशियाचा भारताला मोठा पाठिंबा; 'UNSC चे स्थायी सदस्यत्व भारताला मिळणे गरजेचे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक मंचावर भारताचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. रशियाने भारताचा खरा आणि विश्वासू मित्र असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) उच्चस्तरीय सत्राला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (India In UNGA) भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दाव्याला जोरदार पाठिंबा दर्शवला. भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी जागा मिळणे ही आजच्या जागतिक वास्तविकतेनुसार अत्यंत आवश्यक बाब असल्याचे मत त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडले.
सर्गेई लावरोव्ह यांनी महासभेला संबोधित करताना जागतिक व्यवस्थेतील समतोलावर विशेष भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करताना परिषदेचे मूलभूत अधिकार आणि तिच्या स्थायी सदस्यांचे विशेषाधिकार कमी होता कामा नयेत. त्याच वेळी, आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका यांसारख्या विकसनशील प्रदेशांचे प्रतिनिधित्व वाढवणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या बलाढ्य आणि जबाबदार राष्ट्राला स्थायी सदस्यत्व मिळणे जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे रशियाने नमूद केले.
आपल्या भाषणात लावरोव्ह यांनी पाश्चात्य राष्ट्रांच्या वाढत्या हस्तक्षेपावर आणि प्रतिनिधित्वावर कडक इशारा दिला. सुरक्षा परिषदेच्या संभाव्य सुधारणांमध्ये पाश्चात्य देशांना अतिरिक्त स्थायी जागा देणे पूर्णपणे चुकीचे ठरेल, अशी मॉस्कोची तत्त्वनिष्ठ भूमिका त्यांनी मांडली. जर्मनी आणि जपान या देशांना स्थायी जागा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, हे देश सध्या पुन्हा एकदा लष्करशाही आणि सूडबुद्धीच्या मार्गावर चालत आहेत. त्यामुळे पाश्चात्य राष्ट्रांचा प्रभाव आणखी वाढवण्याऐवजी जागतिक दक्षिण (Global South) देशांना अधिक संधी दिली पाहिजे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
रशियाच्या मते, आशियातून भारत आणि लॅटिन अमेरिकेतून ब्राझील हे देश स्थायी सदस्यत्वासाठी पूर्णपणे पात्र आहेत. तसेच आफ्रिकन खंडातील देशांच्या हिताचा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांचा विचार करून त्यांनाही सुरक्षा परिषदेत योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यावर रशियाने विशेष जोर दिला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी भारताने लावलेला जोर आता रंग लावताना दिसत आहे. रशियाव्यतिरिक्त जगातील इतर अनेक महत्त्वाच्या देशांनी भारताच्या या मागणीला उघडपणे समर्थन दिले आहे. मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री धनंजय रामफुल यांनी महासभेत बोलताना स्पष्ट केले की, त्यांचा देश सुरक्षा परिषदेच्या सुधारणांसाठी जी-४ (G4) आणि एल-६९ (L69) गटांच्या भूमिकेचे समर्थन करतो. जागतिक घडामोडींमध्ये भारताची सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका पाहता, भारत स्थायी सदस्यत्वासाठी पूर्णपणे योग्य उमेदवार आहे, असे रामफुल म्हणाले.
याशिवाय पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो यांनीही सुरक्षा परिषदेत तातडीने संरचनात्मक सुधारणा करण्याची गरज व्यक्त करत भारताच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे. जागतिक स्तरावर भारताची वाढती आर्थिक ताकद, शांतता रक्षण मोहिमांमधील योगदान आणि मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व या घटकांमुळे भारताचा दावा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Toshisuke Kanazawa : ‘या’ व्यक्तीने वयाच्या 90 व्या वर्षी बॉडीबिल्डिंगमधून जिंकली पदके; ‘हा’ जपानी आहार ठरला अत्यंत प्रभावी
सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाचच देश स्थायी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या ५ देशांकडे विशेष नकाराधिकार म्हणजेच ‘व्हिटो पॉवर’ (Veto Power) आहे. यांच्याव्यतिरिक्त १० अस्थायी सदस्य असतात, ज्यांची निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी केली जाते.
मात्र, १९४५ मधील परिस्थिती आणि आजची जागतिक वास्तवता यात प्रचंड फरक पडला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या या सर्वोच्च संस्थेत तातडीने सुधारणा करून भारत, ब्राझील यांसारख्या उदयोन्मुख महासत्तांना स्थायी सदस्यत्व देण्याची मागणी जगभरातून तीव्र होत आहे. रशियाच्या या ठाम भूमिकेमुळे भारताच्या मुत्सद्दी प्रयत्नांना मोठी गती मिळाली आहे.






