
फोटो सौजन्य सोशल मीडिया
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी मॉस्कोत पोहोचले आहेत . त्यांच्या या दौऱ्यात पुतीन यांच्यासोबत महत्वाची बैठक होणार आहे . युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेकडे एक प्रस्ताव असल्याचे ट्रम्प यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे . मॉस्को नंतर दोन्ही दूत युक्रेनची राजधानी किंवा येथे जाण्याची शक्यता आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांच्यासोबतही ते चर्चा करणार आहेत .
अमेरिकन दूतांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने कीव्हवरील हवाई हल्ल्यांना तीन दिवसांचा विराम देण्याचा निर्णय घेतला आहे . हा विराम चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे . झेलेन्स्की यांनीही अमेरिकन दूतांच्या भेटीदरम्यान युक्रेनकडून हवाई हल्ले थांबवण्याची तयारी दर्शवली आहे . त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये तात्पुरता तणाव कमी करण्याची शक्यता निर्माण झाली .
शांतता चर्चेचा मार्ग खुला होत असला तरी रशिया आणि युक्रेनमधील प्रमुख मतभेद अद्याप कायम आहेत . भूभागाचा प्रश्न , युक्रेनची सुरक्षा आणि नाटोशी संबंधित भूमिका हे चर्चेतील सर्वात संवेदनशील मुद्दे आहेत . रशियाच्या काही प्रमुख मागण्या युक्रेनला मान्य नाहीत . तर युक्रेन आपल्या भूभागावर तडजोड करण्यास तयार नसल्याचे स्पष्ट करत आहे . त्यामुळे अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांना स्वीकारता येईल असा तोडगा काढणे हे मोठे आव्हान असणार आहे . दरम्यान युद्धाच्या मैदानावर हल्ले सुरूच असल्याने या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे . विटकॉफ आणि कुशनर यांच्या मॉस्को – कीव्ह दौऱ्यातून युध्दविरामाचा ठोस मार्ग निघतो का , हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .