सहारा वाळवंटातही बर्फवृष्टी झाली आहे, जाणून घ्या हा चमत्कार कसा घडला? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पृथ्वीवरील सर्वात उष्ण, रखरखीत आणि विशाल मानल्या जाणाऱ्या ‘सहारा वाळवंटात’ (Sahara Snowfall ) अचानक बर्फवृष्टी झाली तर कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही. जिथे उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते, तिथे जेव्हा लाल-सोनेरी वाळूच्या टेकड्यांवर पांढऱ्या बर्फाची चादर पसरते, तेव्हा ते दृश्य केवळ विलोभनीयच नव्हे तर सर्वांना थक्क करणारे ठरते. अल्जेरियातील ‘ऐन सेफ्रा’ (Ain Sefra) या शहरात ही दुर्मिळ घटना घडली आहे. या शहराला ‘सहाराचे प्रवेशद्वार’ (Gateway to the Sahara) म्हणून ओळखले जाते. एका अत्यंत उष्ण आणि वाळवंटी प्रदेशात बर्फ पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ जगभरात चर्चेचा विषय बनले आहेत.
ऐन सेफ्रा शहरात १९७९ मध्ये पहिल्यांदा अशा हिमवृष्टीची अधिकृत नोंद झाली होती. त्यानंतर २०१६, २०१७, २०१८, २०२१, २०२२ आणि अलिकडच्या काळातही या भागात बर्फवृष्टीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ही घटना अत्यंत असामान्य असली तरी ती अशक्य नाही. वाळवंटातील तीव्र उष्णता आणि कोरडे हवामान असूनही विशिष्ट हवामान प्रणाली तयार झाल्यास तिथेही बर्फवृष्टी होऊ शकते, हे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
सहारा वाळवंटात बर्फ पडण्यामागे काही विशिष्ट वातावरणीय आणि हवामानशास्त्रीय परिस्थितींचा एकत्रित प्रभाव असतो. हिवाळ्याच्या दिवसांत युरोप खंडाकडून येणारी अत्यंत थंड आणि तीव्र हवा दक्षिण दिशेला उत्तर आफ्रिकेकडे ढकलली जाते. जेव्हा ही थंड हवा अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्रावरून येणाऱ्या दमट हवेच्या संपर्कात येते, तेव्हा हिमवर्षावासाठी आवश्यक असलेली पहिली पायरी तयार होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PoK Protests : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा वणवा; 25 हजार लोकांनी केला LoC ओलांडून भारतात सामील होण्याचा एल्गार
वाळवंटातील हवेची वैशिष्ट्ये म्हणजे तिथे ढगांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे दिवसा सूर्याची उष्णता जेवढ्या वेगाने जमीन शोषून घेते, रात्रीच्या वेळी तितक्याच वेगाने ही उष्णता आकाशात निघून जाते. यामुळे हिवाळ्यातील रात्री सहारातील तापमान खूप वेगाने घसरते. ऐन सेफ्रा परिसरामध्ये बर्फवृष्टी झाली तेव्हा रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाऊन -२°C ते -३°C पर्यंत पोहोचले होते. जेव्हा तापमान शून्यापेक्षा खाली जाते आणि हवेत आर्द्रता उपलब्ध असते, तेव्हा पाण्याचे थेंब गोठून त्याचे बर्फाच्या स्फटिकांमध्ये रूपांतर होते आणि बर्फवृष्टीच्या स्वरूपात ते जमिनीवर पडतात.
ऐन सेफ्रामध्येच ही घटना घडण्यामागे तिथली भौगोलिक रचना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे १,००० मीटर (३,००० फूट) उंचीवर वसलेले असून त्याच्या सभोवताली अॅटलास पर्वतरांगा (Atlas Mountains) आहेत. जेव्हा महासागरावरून येणारी दमट हवा या उंच पर्वतांना धडकते, तेव्हा ती वरच्या दिशेने सरकते. हवा जितकी वर जाते तितकी ती अधिक थंड होते, ज्यामुळे हवेतील बाष्पाचे बर्फात रूपांतर होणे सोपे जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
मात्र, वाळवंटात पडलेला हा बर्फ जास्त काळ टिकू शकत नाही. सूर्योदयानंतर वाळवंटातील कडक उन्हामुळे आणि जमिनीच्या तापमानामुळे बर्फ काही तासांतच वेगाने वितळू लागतो. हिवाळ्यातील अतिथंड रात्री आणि दिवसाचे उबदार वातावरण या वाळवंटी वैशिष्ट्यांमुळे हा बर्फ फार काळ टिकत नसला तरी त्या थोड्या वेळात निसर्गाची एक अप्रतिम किमया पाहायला मिळते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, केवळ एका बर्फवृष्टीच्या घटनेला थेट ‘हवामान बदलाचा’ (Climate Change) पुरावा मानणे योग्य ठरणार नाही, तरीही जागतिक तापमानवाढीमुळे जेट स्ट्रीमच्या प्रवाहात होणाऱ्या बदलांचा अशा असामान्य हवामान घटनांवर काही प्रमाणात प्रभाव पडत असावा, असा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.






