Saudi work visa ban lifted India : सौदी अरेबियामधून येणाऱ्या एक दिलासादायक बातमीमुळे हजारो भारतीय कामगारांना मोठा श्वास घेता आला आहे. सौदी सरकारने ‘ब्लॉक वर्क व्हिसा कोटा’वरील तात्पुरती बंदी हटवण्याचा निर्णय घेतला असून, ही सवलत भारतासह एकूण १४ देशांतील कामगारांसाठी लागू करण्यात आली आहे. विशेषतः हज यात्रेपूर्वी आलेल्या या निर्णयामुळे भारतीय कामगारांना पुन्हा सौदीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, सुदान, इजिप्त, इथिओपिया, इराक, इंडोनेशिया, अल्जेरिया, जॉर्डन, मोरोक्को, ट्युनिशिया, नायजेरिया आणि येमेन या १४ देशांच्या नागरिकांसाठी ‘ब्लॉक वर्क व्हिसा’वर लादलेली तात्पुरती बंदी हटवली आहे. सौदी सरकारच्या मानव संसाधन व सामाजिक विकास मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.
हजपूर्वी लादलेली बंदी हटवली
यावर्षीच्या सुरुवातीस सौदी सरकारने हज हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही तात्पुरती बंदी लागू केली होती. दरवर्षी हजच्या काळात सौदीमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते. परंतु मागील काही वर्षांतील अनुभवांनुसार, इतर प्रकारच्या व्हिसावर आलेले लोकही हजसाठी प्रयत्न करत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.
गेल्या वर्षी उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अनेक नोंदणी नसलेल्या भाविकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे सौदी सरकारने यंदा हजपूर्वी विशिष्ट व्हिसांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता हज २०२५ संपल्यानंतर सौदी प्रशासनाने बंदी हटवून पुन्हा कामगारांसाठी दरवाजे खुले केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायलकडे ‘Iron Dome’ ही ताकत असतानाही इराणने कसा केला संरक्षण मुख्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला?
ब्लॉक वर्क व्हिसा म्हणजे काय?
ब्लॉक वर्क व्हिसा ही एक विशेष योजना आहे, ज्या अंतर्गत सौदी सरकार विविध कंपन्यांना विशिष्ट संख्येने परदेशी नागरिकांची भरती करण्याची परवानगी देते. यामुळे कंपन्यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ सहज मिळू शकते. ही बंदी लादल्यामुळे भारतातील हजारो कुशल कामगारांचे व परदेशी रोजगार स्वप्न थांबले होते. आता ही संधी पुन्हा उपलब्ध झाल्याने अनेक कामगारांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय कामगारांसाठी विशेष दिलासा
सौदी अरेबियामध्ये भारतीय कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार भारतीय समुदायाची संख्या २६ लाखांहून अधिक झाली आहे, आणि ती दरवर्षी सुमारे १०% ने वाढते आहे. भारतातून मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग सौदीत नोकरीसाठी जात असतो. त्यामुळे या बंदीमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. सौदी सरकारने ही बंदी मागे घेतल्याने भारतीय कामगार, एजंट्स आणि नियोक्त्यांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवीन संधींना पुन्हा गती
ही सवलत लागू झाल्यानंतर आता भारतीय कामगार पुन्हा सौदी अरेबियात प्रवेश करू शकतील. विशेषतः कुशल कामगार, टेक्निशियन, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील कामगार आणि विविध सेवा क्षेत्रातील कामगारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. या निर्णयामुळे भारतातील परदेशी रोजगार इच्छुक युवकांसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. सौदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे, भारत-सौदी संबंधांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video : इस्रायलच्या हवाई हल्ल्याने इराणचे आकाश रिकामे; जागतिक उड्डाणे मार्ग बदलू लागली
सौदीत कामासाठी पुन्हा हिरवा कंदील
सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे भारतीय कामगारांसाठी सौदीचे दार पुन्हा खुले झाले आहे. ही केवळ कामाच्या संधीची बाब नसून, परदेशी रोजगाराच्या वाटचालीतील एक सकारात्मक पाऊल आहे. हजपूर्वी लादलेली बंदी मागे घेतल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांचे स्वप्न पुन्हा उभे राहत आहे, आणि त्यामुळे भारत-सौदी आर्थिक संबंधही अधिक दृढ होतील, हे निश्चित.