नवी दिल्ली: भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिच्या सहकाऱ्यांनी 2025 चे स्वागत करत आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नववर्षाचा अनोखा आनंद लुटला आहे. जून 2024 मध्ये सुनिता विल्यम्सची अंतराळात बोइंग स्टारलाइनर मिशनसाठी कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 8 दिवसांचे नियोजित असलेले हे मिशन तांत्रिक अडचणींमुळे मार्च 2025 पर्यंत लांबले आहे. पण तरीही त्या अंतराळातून लोकांना प्रेरित करत आहे. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना नववर्षात एक अनोखे दृश्य अनुभवायला मिळाले.
16 सूर्योदय आणि सूर्यास्तांचा दुर्मिळ अनुभव
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीभोवती 90 मिनिटांत परिक्रमा करते. म्हणजेच एक्सपिडिशन 72 क्रू 2025 मध्ये सुमारे 400 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. यामुळे सुनिता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने एका दिवसांत तब्बल 16 सुर्योद्य आणि सुर्यास्त अनुभवले आहेत. नववर्ष साजरे करण्यासाठी क्रूने ताज्या सामग्रीपासून बनवलेल्या खास खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला आणि व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
As 2024 comes to a close today, the Exp 72 crew will see 16 sunrises and sunsets while soaring into the New Year. Seen here are several sunsets pictured over the years from the orbital outpost. pic.twitter.com/DdlvSCoKo1
— International Space Station (@Space_Station) December 31, 2024
अंतराळातील उत्सव आणि वैज्ञानिक कामगिरी
सुनीता विलियम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नववर्षासोबतच ख्रिसमसचाही उत्साहात आनंदात साजरा केला. त्यांनी सजावट, विशेष मेजवानी, आणि विविध परंपरा साजऱ्या केल्या. त्याचबरोबर आयएसएसवर महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन सुरूच ठेवले आहे. अंतराळात जास्त काळ राहण्याच्या आव्हानांना सामोरे जात त्यांनी मानवी जिद्दीचे उदाहरण घालून दिले आहे. सुनीता विलियम्सने अंतराळाला आपले “आनंदाचे ठिकाण” म्हणून वर्णन केले आहे.
मानवतेसाठी एक प्रेरणादायी संदेश
या अनोख्या प्रवासादरम्यान सुनिता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने सण साजरे करत आनंद आणि सौहार्दाचे दर्शन घडवले. त्यांचा अनुभव जागतिक पातळीवर अंतराळ संशोधनासाठी प्रेरणादायी ठरला आहे. 2025 मध्ये प्रवेश करताना, सुनिता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांनी अंतराळ प्रवासाच्या कठीण परिस्थितीवर मात करत मानवी क्षमता आणि चिकाटीचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. त्यांच्या या प्रवासाने जागतिक स्तरावर अंतराळ संशोधनासाठी नवी दिशा दिली असून मानवतेसाठी एक प्रेरणादायी संदेश दिला आहे.