
( फोटो सौजन्य : AI )
तेल प्रकल्पांमधील स्फोटांनंतर आकाशात गेलेला धूर आणि रासायनिक कण पावसामुळे खाली येण्याची दाट शक्यता आहे. रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते, हा पाऊस ‘केमिकल बर्न’ देणारा ठरू शकतो. ज्यामुळे त्वचेला गंभीर इजा होऊ शकते. तसेच, हवेतील विषारी कण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी काळ्या धुराच्या संपर्कात आले असेल, तर त्यांनी तातडीने मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात, अशा सूचना टेलिग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दृश्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. तेल डेपो उद्ध्वस्त झाल्यामुळे लाखो लिटर तेल तेहरानच्या ‘सीवेज सिस्टम’मध्ये झिरपले आहे. यामुळे राजधानीच्या रस्त्यांच्या कडेने चक्क ‘आगीची नदी’ वाहताना दिसत आहे. युद्धाच्या इतिहासात नागरी औद्योगिक क्षेत्राला लक्ष्य करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमुळे इराणमधील सुमारे १०,००० नागरी बांधकामांचे नुकसान झाल्याचा दावा रेड क्रिसेंटने केला आहे.
तेहरानमध्ये सध्या श्वास घेणेही कठीण झाले आहे. हवा पूर्णपणे विषारी झाली असून, प्रदूषणाची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर गेली आहे. एकीकडे लष्करी हल्ले सुरू असताना दुसरीकडे या पर्यावरणीय आपत्तीशी लढणे इराणपुढील मोठे आव्हान ठरत आहे. आगीच्या ज्वाळा अजूनही पूर्णपणे विझलेल्या नाहीत आणि त्यातच संभाव्य विषारी पावसामुळे तेहरानवासीयांच्या मनात मोठी धास्ती निर्माण झाली आहे.