फोटो सौजन्य : सोशल मीडिया
लंडन: ब्रिटनमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. गुरुवारी (दि.4) या निवडणुका होणार आहेत. सध्या भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. एकेकाळी जवळपास 200 वर्षे अर्ध्याहून अधिक जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश संसदेत आता मोठा बदल दिसून येत आहे. यावेळी, भारतीय वंशाचे 100 हून अधिक उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
यावेळी ऋषि सुनक यांच्यासह एकूण 107 भारतीय वंशाचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यूकेच्या संसदेत यावेळी कनिष्ठ सभागृह ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये एकूण 650 जागा आहेत. संसदेत 15 भारतीय वंशाचे खासदार आहेत. यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणजेच कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून 30 ब्रिटिश भारतीय उमेदवार निवडणूक लढणार आहेत. त्यात 23 नवीन चेहरे आहेत. भारतीय वंशाच्या सात ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा निवडणुकीची तिकिटे मिळाली आहेत. ऋषी सुनक, प्रिती पटेल आणि सुएला ब्रेव्हरमन यांची नावे आघाडीवर आहेत.
तसेच लेबर पार्टीतून यावेळी 33 ब्रिटिश भारतीय निवडणूक रिंगणात आहेत. त्यात 26 नवीन चेहरे आहेत. जुन्या प्रबळ उमेदवारांपैकी तमनजीत सिंग, सीमा मल्होटा हे उमेदवार निवडणुकीस उभे राहिले आहेत.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाची आश्वासने
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्ष आहे. या पक्षाने जाहीरनाम्यात अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सुनक यांनी कर कमी करणे, सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे बजेट वाढवणे यासारखी आश्वासने 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा दावा केला आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने स्थलांतरितांची संख्या मर्यादित करण्याचे आणि काही निर्वासितांना रवांडामध्ये पाठविण्याचे आश्वासन देखील दिले आहे. गेल्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 365 जागा मिळाल्या होत्या. गेल्या 14 वर्षांपासून हा पक्ष सत्तेत आहे.
इतर पक्ष
यावेळी लिबरल डेमोक्रॅट्स, रिफॉर्म यूके, स्कॉटिश नॅशनल पार्टी आणि ग्रीन पार्टी देखील निवडणूक लढवत आहेत. यावेळी प्रत्येक राजकीय पक्षाने पुरेशा प्रमाणात भारतीय वंशाच्या उमेदवारांना तिकीट दिले ही आनंदाची बाब आहे.