Ukrainian President Volodymyr Zelensky says excluding Ukraine from US-Russia ceasefire is very dangerous
कीव: गेल्या तीन वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन योजना तयार केली आहे. या संदर्भात विविध स्तरांवर चर्चासत्रे सुरू आहेत. दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले आहे की, जर या युद्धविराम चर्चेतून युक्रेनला वगळण्यात आले, तर त्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एका मुलाखती दरम्यानत्यांनी असेही स्पष्ट केले की, रशियाला या चर्चेत सहभागी व्हायचे नाही, पुतिन यांना कोणत्याही प्रकारची शांतता नको आहे.
त्यांनी असेही सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना ऊर्जा आणि बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून युद्धविरामासाठी सहमत करू शकतात.
युद्धविराम चर्चेची गती वाढवावी – झेलेन्स्की
झेलेन्स्की यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प यांचे रशियाशी काही वैयक्तिक संबंध असतील, पण युक्रेनला युद्धबंदीच्या चर्चेतून वगळून शांतता चर्चेचा कोणताही निर्णय घेणे धोकादायक ठरेल. जर कोणतीही चर्चा होत असेल, तर त्यामध्ये युक्रेनचा सहभाग अनिवार्य आहे. तसेच, कीव आणि वॉशिंग्टन यांच्यातील चर्चांना अधिक वेग द्यावा लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर झेलेन्स्की यांनी लगेचच हे विधान केले आहे. ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते की, अमेरिकन आणि रशियन अधिकारी युद्ध संपवण्याच्या दृष्टीने आधीच चर्चा करत असून त्यांच्या प्रशासनाने रशियाशी गांभीर्याने चर्चा केली आहे.
झेलेन्स्की ट्रम्प यांच्या संपर्कात
झेलेन्स्की यांनी असेही सांगितले की, त्यांची टीम ट्रम्प प्रशासनाशी संपर्कात आहे. मात्र, चर्चा अजून प्राथमिक स्तरावर असून युद्धविरामासंबंधी अधिक स्पष्टता आणि ठोस निर्णय घेण्यासाठी लवकरच प्रत्यक्ष बैठका होतील. त्यांनी नमूद केले की, शांततेसाठी अजून अधिक प्रयत्न करावे लागतील.
3 वर्षापासून सुरु आहे युद्ध
युक्रेन आणि रशिया युद्ध गेल्या 3 वर्षापासून सुरु असून यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा बळी गेला आहे. मात्र, ट्रम्प आता युद्धाला एका निर्णायक वळणावर आणण्याचा प्रयत्न करत असून शांततेची अपेक्षा केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वीच हे युद्ध संपवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांत युद्ध थांबवण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, प्रत्यक्षात युद्धविरामाच्या चर्चांना अजूनही सुरुच आहे.