चीनला घेरण्याची अमेरिकेची पाण्याखालील तयारी, का बनणार 19 अमेरिकन पाणबुड्यांसमोर मोठे आव्हान? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
इंडो-पॅसिफिक क्षेत्रात (Indo-Pacific Region) अमेरिका आणि चीन यांच्यातील लष्करी संघर्षाची धार दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. तैवानच्या मुद्द्यावरून वाढणारा तणाव पाहता समुद्राच्या पृष्ठभागावर युद्धनौकांची तैनाती जेवढी महत्त्वाची आहे, त्याहून कितीतरी पटीने अधिक महत्त्व समुद्राच्या अथांग खोलीत चालणाऱ्या गुप्त हालचालींना प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन नौदलाने (US Navy) एक अत्यंत मोठा रणनीतिक निर्णय घेतला आहे. चीनच्या वाढत्या लष्करी आणि नौदलाच्या ताकदीला शह देण्यासाठी अमेरिका आपल्या १९ ‘व्हर्जिनिया-क्लास’ (Virginia-class) अणु-पाणबुड्यांचे वर्गीकरण अधिकृतपणे SSGN (गाईडेड मिसाईल सबमरीन) मध्ये करत आहे.
चीनने आपल्या किनारपट्टीवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण प्रणालीचे एक भक्कम ‘अँटी-ॲक्सेस/एरिया डिनायल्स’ (A2/AD) जाळे विणले आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांना चीनच्या जवळ येणे धोक्याचे ठरू शकते. अशा वेळी गुप्तपणे पाण्याखाली राहून हल्ला करणाऱ्या अणु-पाणबुड्या हा अमेरिकेसाठी सर्वात मजबूत आणि प्रभावी शस्त्र ठरतात. जपान, तैवान आणि फिलीपिन्सला जोडणाऱ्या ‘फर्स्ट आयलंड चेन’ (First Island Chain) मध्ये चीनचे कमांड सेंटर्स, रडार आणि क्षेपणास्त्र तळांवर अचानक प्रहार करून चीनची संरक्षण यंत्रणा उध्वस्त करण्याची क्षमता या व्हर्जिनिया सबमरीनमध्ये असेल.
या नवीन व्हर्जिनिया-क्लास SSGN पाणबुड्यांमध्ये ‘व्हर्जिनिया पेलोड मॉड्यूल’ (VPM) नावाचा सुमारे ८४ फूट लांबीचा विशेष भाग जोडला जात आहे. या मॉड्युलमध्ये चार मोठ्या उभ्या प्रक्षेपण नलिका (Vertical Launch Tubes) असतील आणि प्रत्येक नलिकेत ७ टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे (Tomahawk Cruise Missiles) बसवता येतील. यामुळे एका पाणबुडीची क्षेपणास्त्र वहन क्षमता १२ वरून थेट सुमारे ४० टोमाहॉक्सवर पोहोचेल. एवढेच नाही, तर या VPM तंत्रज्ञानामुळे भविष्यात अत्यंत विनाशकारी हायपरसॉनिक शस्त्रे (Hypersonic Weapons) आणि पाण्याखालील ड्रोन डागणे देखील शक्य होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US War : पश्चिम आशियातील महायुद्ध तीव्र; इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी टीव्ही मुलाखतीत उघड केला मोठा कट
या रणनीतीमध्ये अमेरिकेसमोर एक मोठे तांत्रिक आणि वेळेचे आव्हान उभे ठाकले आहे. अमेरिकन नौदलाच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या ‘ओहायो-क्लास’च्या (Ohio-class) चार SSGN पाणबुड्या USS ओहायो, मिशिगन, फ्लोरिडा आणि जॉर्जिया २०२६ ते २०२८ दरम्यान टप्प्याटप्प्याने सेवेतून निवृत्त होत आहेत. एका ओहायो श्रेणीतील सबमरीनमध्ये तब्बल १५४ टोमाहॉक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
या तुलनेत, नवीन व्हर्जिनिया-क्लास SSGN फक्त ४० क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकते. म्हणजेच, एका जुन्या ओहायो सबमरीनच्या मारक क्षमतेची बरोबरी करण्यासाठी अमेरिकेला किमान चार नवीन व्हर्जिनिया पाणबुड्यांची गरज भासेल. दुसरीकडे, पहिली नवीन व्हर्जिनिया SSGN २०२९ च्या आसपास ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ओहायो सबमरीन निवृत्त होणे आणि व्हर्जिनिया ताफ्यात येणे यामधील २०२६ ते २०२९ दरम्यानचा हा कालावधी अमेरिकेसाठी लष्करी दृष्टीने अत्यंत संवेदनशील (Capability Gap) मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh: शेख हसीना पूर्ण तयारीने उतरणार मैदानात; दोन मोठ्या पक्षांचे विलीनीकरण अन् बदलणार बांगलादेशचे सत्तासमीकरण
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) च्या अहवालानुसार, चीनने अलिकडच्या वर्षांत अणु-पाणबुड्यांच्या निर्मितीत अमेरिकेलाही मागे टाकले आहे. चीनने आपल्या ‘टाइप ०९३बी’ (Type 093B Shang III) या व्हर्टिकल लाँच सिस्टीम असलेल्या प्रगत गाईडेड मिसाईल सबमरीन आणि ‘टाइप ०९४’ (Type 094 Jin) बॅलिस्टिक मिसाईल सबमरीनची निर्मिती कमालीच्या वेगाने सुरू केली आहे. हुलुदाओ (Huludao) येथील शिपयार्डचा विस्तार करून चीनने निर्मिती क्षमता दुपटीने वाढवली आहे.
जरी तांत्रिक आणि आवाजाच्या बाबतीत (Acoustic Stealth) अमेरिकन पाणबुड्या अजूनही चिनी पाणबुड्यांपेक्षा अधिक प्रगत आणि गुप्त असल्या, तरी चिनी पाणबुड्यांची वाढती संख्या आणि दक्षिण चीन समुद्रातील त्यांचे वर्चस्व अमेरिकन नौदलाची चिंता वाढवणारे ठरत आहे. अमेरिकेत सध्या प्रतिवर्ष १.१ ते १.२ व्हर्जिनिया सबमरीन तयार होत आहेत, तर लक्ष्य वर्षाला २ पाणबुड्यांचे आहे. त्यामुळे येत्या काळात २०२९ नंतर प्रशांत महासागराच्या खोलीत अमेरिका आणि चीन यांच्यातील ही ‘अंडरवॉटर’ लष्करी स्पर्धा अधिक रंजक आणि विनाशकारी वळण घेण्याची शक्यता आहे.






